आपदा मित्र प्रथमेश गावडे याची कौतुकास्पद कामगिरी
सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभरातील आपदा मित्रांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रत्येक राज्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १ आपदा मित्र व १ आपदा सखी यांचे नामनिर्देशन मागविण्यात आले होते. त्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील रहिवासी आपदा मित्र प्रथमेश गावडे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र शासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आलेला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमातून तयार झालेले आपदा मित्र जिल्हा प्रशासनास विविध आपत्तींच्या वेळी मदत करत असतात. तसेच आपत्ती व्यवस्थापन पूर्व तयारी, प्रशिक्षण व क्षमता बांधणी चे विविध कार्यक्रम देखील ते घेत असतात. कुणकेश्वर यात्रा, आंगणेवाडी यात्रा अशा यात्रांमध्ये देखील या आपदा मित्रांची प्रशासनाला मदत होत असते. जिल्ह्यात एकूण २०० आपदा मित्र असून राज्यात अजून पर्यंत १३,३०० आपदा मित्रांना शासनामार्फत आपदा मित्र प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. कोणत्याही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपदा मित्रांची मदत प्रशासनाला होत असते.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १ आपदा मित्र आणि १ आपदा सखी यांचे नामनिर्देशन राज्य शासनाला सादर करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या होत्या. जिल्ह्यातून आपदा मित्र प्रथमेश गावडे व आपदा सखी चैताली देसाई यांचे नामनिर्देशन राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेले होते. राज्य शासनाकडे प्राप्त झालेल्या विविध जिल्ह्यातील नामनिर्देशनामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे राहणारा आपदा मित्र प्रथमेश गावडे यांनी आपत्ती व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्याची दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या आपदा मित्र कार्यक्रमासाठी निवड झाली.
निवड झालेल्या आपदा मित्रांना दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या विशेष अतिथी म्हणून राष्ट्रपती भवनात आमंत्रित करण्यात आलेले होते. या अनुषंगाने प्रथमेश गावडे यांना राष्ट्रपती भवन प्रत्यक्ष पाहण्याची व महामहीम राष्ट्रपती यांच्यासोबत संवादाची सुवर्ण संधी प्राप्त झाली. तसेच महामहीम राष्ट्रपती यांच्या विशेष अतिथी म्हणून निवड झालेल्या आपदा मित्रांबरोबरच प्रथमेश गावडे यांना दिल्ली मधील कर्तव्यपथावरील संचलन कार्यक्रम अनुभवता आला. तसेच २६ जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात गृहमंत्री भारत सरकार यांच्यासोबत आपदा मित्रांसाठी विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. याकार्यक्रमात भाग घेण्याची सुवर्ण संधीही प्रथमेश गावडे यांना मिळाली.
आपत्ती व्यवस्थापनात प्रथमेश गावडे यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत त्याची दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून झालेली निवड ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्गसाठी अत्यंत गौरवास्पद बाब असून या करिता प्रथमेश गावडे याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मच्छिंद्र सुकटे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
