युवकांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्वावलंबनावर भर, विजयाचा आत्मविश्वास
सावंतवाडी :
इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात विकासकेंद्री राजकारणाची चर्चा रंगू लागली असून, महायुतीचे उमेदवार झेवियर फर्नांडिस यांनी युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. रोजगारासाठी गोवा किंवा अन्य राज्यांकडे स्थलांतर थांबवण्यासाठी ठोस विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान सांगितले. मतदारांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विजयाचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इन्सुली मतदारसंघातून जाणारा मुंबई–गोवा महामार्ग हा विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे नमूद करत फर्नांडिस म्हणाले की, या महामार्गाचा प्रभावी वापर करून आगामी काळात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. स्वतः व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे व्यवसायातील बारकावे तसेच तरुणांना भेडसावणाऱ्या अडचणींची आपल्याला प्रत्यक्ष जाण असल्याचे त्यांनी सांगितले. याच अनुभवाच्या जोरावर मतदारसंघातील नवउद्योजकांना योग्य दिशा व पाठबळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, विकासकामांना गती देणे आणि प्रगतीची नवी दिशा निर्माण करणे यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे झेवियर फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. वाढता जनसमर्थन पाहता इन्सुली मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळात याबाबत सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे.
