घराघरांत विकासाचा अजेंडा; सोनाली सुनील घाडीगांवकर यांच्या मोहिमेला जनसमर्थन
मालवण :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना आडवली–मालडी मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर यांनी राबवलेल्या ‘डोअर टू डोअर’ प्रचार मोहिमेला मतदारांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आडवली–मालडी मतदारसंघ हा खासदार नारायण राणे यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. या भागावर सोनाली घाडीगांवकर यांचे पती सुनील घाडीगांवकर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असून लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघाने सातत्याने महायुतीला भरघोस मतदान केले आहे. तोच विश्वास आणि परंपरा आता जिल्हा परिषद निवडणुकीतही कायम राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रचाराच्या दरम्यान सोनाली घाडीगांवकर यांनी निरोम, मठ बुद्रुक, बुधवळे, कुडोपी, श्रावण, रामगड, गोठणे, किर्लोस, असगणी, राठिवडे, घाडीवाडी, हिवाळे, शिरवंडे, असरोंडी आणि ओवळीये या गावांचा सखोल दौरा पूर्ण केला. प्रत्येक गावात नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
“महाविकास आघाडीच्या काळात रखडलेली विकासकामे मार्गी लावणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने विकासाची गती अधिक वेगाने वाढवणे शक्य होईल,” असा विश्वास त्यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला.
ग्रामीण भागात आरोग्य सुविधा बळकट करणे, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, प्रत्येक घराला शुद्ध पाणी व अखंडित वीजपुरवठा, शेती आणि दळणवळणासाठी अंतर्गत रस्ते मजबूत करणे, बचतगटांच्या माध्यमातून महिलांना तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे यावर आपला विशेष भर राहील, असे आश्वासन सोनाली घाडीगांवकर यांनी दिले.
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विकासाची गंगा वाहत असून, ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी सोनाली घाडीगांवकर यांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. “आडवली–मालडीत केवळ महायुतीचाच विजय होणार,” असा ठाम विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
