*इति ज्येष्ठ कवी प्रा.अशोक बागवे सर*
मुंबई / डोंबिवली :
ओंजळीतील शब्दफुले समूह आयोजित आणि यशदा फाऊंडेशन पुरस्कृत वृत्तबद्ध कविता स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा आणि निमंत्रितांचे कवी संमेलन रविवार दि.१ फेब्रुवारी २०२६ रोजी डोंबिवली येथील विनायक सभागृहात सुनियोजित सुफल संपन्न झाले. विजेत्यांना ज्येष्ठ कवी प्रा.अशोक बागवे यांच्या हस्ते बक्षीस म्हणून रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर यशदा फाऊंडेशच्या डॉ.श्रद्धा घैसास, डॉ.विजय जोशी (ठाणे/ऑस्ट्रेलिया) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी गझलकार तथा समूह प्रशासक विजो (विजय जोशी) यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष प्रा.अशोक बागवे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून खास आलेल्या निमंत्रित कवींचा अध्यक्षांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी यशदा फाऊंडेशन डॉ.श्रद्धा घैसास यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच ओंजळीतील शब्दफुले समूहाचे ज्येष्ठ सदस्य, नाम.नितीनजी गडकरींचे रस्ते बांधणी विषयक सल्लागार डॉ.विजय जोशी (ठाणे/ऑस्ट्रेलिया) यांनी देखील आपले बहुमोल विचार व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
*”कवितेचे एबोर्शन करू नका” – इति ज्येष्ठ कवी प्रा.अशोक बागवे सर…*
अध्यक्ष स्थानावरून बोलताना बागवे सरांनी आपल्या सुमारे ३५ मिनिटांच्या भाषणात उपस्थित कवींना अनेक मुद्द्यांवर मोलाची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. ते कवितेबाबत बोलताना म्हणाले, “आईच्या कुशीत पहिल्यांदा बाळ येतं ना तेव्हा आई त्याला डोळेभरून पाहते तसेच कवितेचा जन्मल्यावर तिच्याकडे पहा, लगेच तिला फेसबुकवर टाकू नका, आपली कविता आधी स्वतः फेस करा, स्वतः समजून घ्या, तिच्यावर प्रेम करा..तिला मायेचा ओलावा द्या. कविता म्हणजे आत्मशोध आहे, आत्म उत्खनन आहे. आपल्या आत असलेलं शल्य जर खरं असेल तर कौशल्य आपोआप येतं”. असे मौलिक विचार अनेक कोपरखळ्या मारत हसत हसत प्रत्येकाच्या मनात उतरविले. यावेळी ज्येष्ठ कवी नारायण लाळे सर, लेखक साहित्यिक मनिष पाटील, ज्येष्ठ कवी जयंत भावे…इ. अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
*वृत्तबद्ध कविता स्पर्धेला कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
ओंजळीतील शब्दफुले समूह आयोजित वृत्तबद्ध कविता स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १६७ वृत्तबद्ध कविता आल्या होत्या. ज्येष्ठ कवी गझलकार साहित्यिक डॉ. प्रल्हाद देशपांडे यांनी या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. भरघोस प्रतिसाद लाभल्याने प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ – २ आणि दखलपात्र – ५ कवितांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक निशा वर्तक – मुंबई, द्वितीय क्रमांक, राहूल नंदकिशोर कुलकर्णी – धुळे, तृतीय क्रमांक, अदिती सहस्त्रबुद्धे – कल्याण, उत्तेजनार्थ अर्चना देवधर – रत्नागिरी, श्रीकांत भानगावकर – मुंबई यांना देण्यात आले तर मेघना चितळे – चिपळूण, भक्ती काळे – पुणे, गौरी शिरसाट – मुंबई, वैभव लोखंडे – ठाणे, आमोद कुलकर्णी – गोवा यांच्या कवितांना देखील दखलपात्र म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ओंजळीतील शब्दफुले समूहातील निमंत्रित कवींचे संमेलन संपन्न झाले. यामध्ये जवळपास ३० कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून उत्तरोत्तर कार्यक्रमात रंग भरले. सहभागी सर्व कवींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी अनंत जोशी यांनी केले. हा सोहळा संपन्न होण्यासाठी ओंजळीतील शब्दफुले समूहाचे प्रशासक आणि समन्वयक – विजो (विजय जोशी), चैत्राली जोगळेकर, मानसी चापेकर, अनंत जोशी, अजित महाडकर, रवींद्र कारेकर, अदिती सहस्त्रबुद्धे, पद्माकर भावे यांनी अथक मेहनत घेतली.
ही स्पर्धा आणि निमंत्रितांचे कवी संमेलन यशदा फाऊंडेशन, डोंबिवली यांनी पुरस्कृत केले याबद्दल संस्थापक डॉ.अनिल घैसास यांचे विजो (विजय जोशी) यांनी ओंजळकरांच्या वतीने आभार व्यक्त केले.
