गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्या प्रकरणाची सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी गजानन मारणेसह नऊ जणांना अटक केली. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता त्यांनी प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूरही करण्यात आला. मात्र राज्यात अशाप्रकारे गुंडाने मिरवणूक काढून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्याचं बोललं जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवजंयतीनिमित्त शिवनेरी गडावर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गजानान मारणेकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आहे. त्याची माहिती आल्यानंतर कारवाई केली जाईल”.