पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा; शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भाजपात वाटचाल
कणकवली :
कोकणच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड हरकुळ बुद्रुक येथे घडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रभावी नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून ‘कमळ’ हाती घेतले. रविवारी हरकुळ बु. येथे झालेल्या भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सोबत हरकुळ बु. विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी झाले.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. कणकवली मतदारसंघात भाजपची ताकद या प्रवेशामुळे दुपटीने वाढली आहे.
या सोहळ्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, बबलू सावंत यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सतीश सावंत यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, विविध गावांचे सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.
सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. काही काळ राजकीय मतभेदांमुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये परतल्याने राजकीय वर्तुळात ही स्पष्टपणे ‘घरवापसी’ मानली जात आहे.
सतीश सावंत हे केवळ नेते नव्हे तर ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा अध्यक्ष होते. त्यांच्या सोबत हरकुळ बु. सरपंच आनंद ठाकूर, भिरवडे सरपंच नितीन सावंत, बेनी डिसोझा, मंगेश सावंत यांसारख्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याने ठाकरे गटाची स्थानिक फळी कमकुवत झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच झालेली ही घडामोड ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरत आहे.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून सतीश सावंत यांचा सहकार क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा बँक, विविध विकास सोसायट्या आणि ग्रामीण अर्थकारणावर भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
या वेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये हरकुळ खुर्द सोसायटी व्हाइस चेअरमन नित्यानंद चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर, अर्चना घाडीगावकर, सोसायटी संचालक हनुमंत घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत, माजी सरपंच संदीप रासम, राजेंद्र ढवण, सहदेवळे, नागवे माजी सरपंच बाळा सावंत, चंद्रकांत सावंत, अजय सावंत यांच्यासह हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील १५० प्रमुख पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
