कोकणवासियांसाठी उपयुक्त आणि सर्वसमावेशक केंद्रीय अर्थसंकल्प : प्रभाकर सावंत
नारळ, काजू, मत्स्यपालन, पर्यटन व पशुपालनाला विशेष चालना; ५०० अमृत जलाशयांची घोषणा
कुडाळ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांसह समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा व सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. विशेषतः कोकणासाठी नारळ, काजू, मत्स्यपालन, पर्यटन व पशुपालन क्षेत्रावर भर देण्यात आल्याने हा अर्थसंकल्प कोकणवासियांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुडाळ येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण पाहण्यात आले. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून येत्या १० फेब्रुवारीपर्यंत विशेष प्रचार अभियान राबवण्यात येणार असल्याची माहितीही श्री. सावंत यांनी दिली.
यावेळी बोलताना प्रभाकर सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग बारा वर्षे देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहेत. या कालावधीत २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश आले असून, हेच या अर्थसंकल्पीय धोरणांचे मोठे यश आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, लघुउद्योग, क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, महिला व युवा वर्ग यांच्यावर या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आले आहे.
कृषी क्षेत्रासाठी किसान सन्मान योजना, खतांवरील अनुदान, सुलभ कर्ज योजना राबवण्यात आल्या असून उत्पादकता वाढवण्यावर सरकारचा भर आहे. आरोग्य क्षेत्रात भारताला बायोफार्मा हब बनवण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कॅन्सर, मधुमेह यांसारख्या आजारांवरील औषधे जेनेरिक मेडिसिनद्वारे स्वस्त करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
कोकणातील नारळ व काजू उत्पादनाला चालना देण्यासाठी विशेष संवर्धन योजना राबवण्यात येणार असून, मत्स्यपालनासाठी ५०० अमृत जलाशय उभारले जाणार आहेत. याचा मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे. पशुपालनासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल. तसेच ग्रामीण भागात महिलांसाठी ‘शी-मार्ट’ उभारण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला रणजित देसाई, संध्या तेरसे, संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, सुधीर झांट्ये, बंड्या सावंत, सुनील बांदेकर, राजू गवंडे, किरण शिंदे, ममता धुरी आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
