पालकमंत्री नितेश राणे यांचे स्पष्ट आवाहन; खा. नारायण राणे यांच्या विचारांची जिल्हा परिषदेत सत्ता येणार, असा विश्वास
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी कलमठ जिल्हा परिषद व पंचायत समिती येथील दोन्ही उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे यांनी केले. खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद निवडणूक लढवली जात असून, या निवडणुकीत जिल्हा परिषदेत खा. राणे यांच्या विचारांची सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कलमठ मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकाच विचारांचे लोकप्रतिनिधी सत्तेत असणे आवश्यक असून, विकासासाठी लागणारा निधी मिळवण्याचा तोच योग्य मार्ग आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यांची कलमठ येथे प्रचार बैठक पार पडली.
या बैठकीला कलमठ जिल्हा परिषद उमेदवार सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती उमेदवार गुरुनाथ वर्देकर, वरवडे पंचायत समिती सदस्य सोनू सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, गावचे खोत सुनील नाडकर्णी, माजी सभापती प्रकाश सावंत, माजी उपसभापती महेश गुरव, रामू विखाळे, महेश लाड, सुभाष राणे, स्वप्निल चिंदरकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आपल्या विकासासाठी मला इतर लोकप्रतिनिधींच्या विचारांची गरज नाही. पालकमंत्री म्हणून मी थेट मदत करू शकतो. एकाच विचारांचे लोकप्रतिनिधी असतील तरच चांगला व वेगवान विकास शक्य आहे,” असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडे उमेदवार उभे करण्यासाठी ओढाताण सुरू असताना, महायुतीकडे सक्षम उमेदवारांची गर्दी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“आपण सर्वजण खा. नारायण राणे यांच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. मला आमदार व पालकमंत्री म्हणून ताकद देण्यासाठी ७ तारखेला मतदान करा. कलमठ जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य दिल्यास येथील प्रश्न तात्काळ सोडवण्याची जबाबदारी माझी असेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार सुप्रिया मेस्त्री, गुरुनाथ वर्देकर व सुनील नाडकर्णी यांनाही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
