You are currently viewing जुनं ते सोनं

जुनं ते सोनं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*जुनं ते सोनं*

 

वास्तविक मी,आमच्यावेळी असे काही नव्हते बाई!असे म्हणणार्‍या सदरातील व्यक्ती नाहीच.मला बदल आवडतात.जे जे नवीन ते संपूर्णपणे स्वीकारले नाही तरी त्यांची ओळख असावी असे मला वाटते.तरुण पिढीबरोबर तसे माझे चांगले जमते.त्यांची बदललेली भाषा, बदललेली जीवनपद्धती,त्यांची वस्त्रसंस्कृती,खाद्यसंस्कृती, अत्याधुनिक तांत्रिकतेशी त्यांची असलेली निस्सीम मैत्री,याविषयी मला प्रचंड कुतुहल असते.खरोखरच जग किती बदलले याचे विलक्षण नवल वाटते.

 

पण तरीही ऐंशीच्या उंबरठ्यावर अनुभवाचा अधिकार गाजवून,सतत त्यांना धोक्याच्या सूचना देण्यात मला काही कर्तव्य बजावल्याचा आनंद होत नसतो.काळाप्रमाणे बदल हे होणारच.

अगदी त्यांच्या हातात हात घालून नाही शकलो तरी त्यांच्या पाठीमागे, कधी सोबतीने,कधी बरोबर जायला हवे असे मला वाटते.

माझ्या आयुष्याचा ,मागे वळून जेव्हां मी मागोवा घेते,तेव्हा मला जाणवते की मीही बदललेच आहे की!लहानपणी मी पाटे वरवंटे,उखळ,जाते ,चूल ,शेगडी,

बंब या वस्तुंसोबत वाढले ,ते सारे मला सोडून गेलेच की! का मी त्यांना सोडले?(पण आता ते अँटीक पीसेस म्हणून माझ्या घराचे डेकॉर आहेत.)

आता माझ्या घरात सगळी ईलेक्ट्राॅनीक गॅझेट्स आहेत आणि त्या केवळ चैनीच्या वस्तु नसून माझ्या आयुष्याच्या गरजाच बनल्या आहेत.मग हे नेमकं कधी झालं,कां झालं,या प्रश्नांच्या भानगडीत मी तरी कुठे पडले?ई मेल्स, व्हाॅट्सॲप,फेसबुक या परिवारात मीही पार बुडालेली आहे.किती बदलले मी?मी सुखी आहे का?आनंदी आहे का?निदान मजेत तरी आहे का याचा विचार तरी मी करते कां?

पण त्यादिवशी,एक गंमत झाली.

कुरीअरवाल्याने ,एक सफेद रंगाचा,

गुळगुळीत लिफाफा माझ्या हातात ठेवला.तो जेव्हां मी उघडला तेव्हां त्यात,रेघा असलेल्या कागदावर सुंदर अक्षरात लिहिलेले ,माझ्या बहिणीचे पत्र होते. खरं सांगू! इतक्या वर्षांनी आलेले,धाकट्या बहिणीचे ते स्वअक्षरातले पत्र पाहून एक अनामिक आनंदाची लाट फुटली. वाचण्याआधीच

डोळे पाणावले.कितीतरी वेळ मी तिच्या अक्षरांवर नुसता हात फिरवत राहिले.एक प्रचंड उर्जा होती त्यात. ते निर्जीव नव्हते.उबदार होते.आणि मग जाणवले,

शेवटी,”जुनं तेच सोनं!”

ओहायोला मुलीकडे असताना,जवळच राहणार्‍या तिच्या मैत्रीणीने आम्हाला जेवायला बोलावले होते.अत्याधुनिक

पद्धतीने सजवलेले तिचे घर सुंदरच

होते.मात्र माझ्या लक्षात राहिले ते

तिच्या मुख्य दरवाजाजवळचे तुळशी वृंदावन!घरात शिरतानाच दिसलेली कोनाड्यातली गणपतीची मंगलमूर्ती!

जेवणाचा तर अगदी साग्रसंगीत बेत होता.शिवाय चकचकीत स्टीलची ताटे,वाट्या, चमचे,पेले यांची सुरेख मांडलेली पंगत!टेबलावर का असेना,

त्यात जुन्या आठवणी जपलेल्या होत्या.

श्रीखंडपुरी,बटाट्याची पिवळी भाजी, नारळाची चटणी,मसालेभात असा पक्का महाराष्ट्रीयन बेत.सर्वच तिने खपून केले होते.मला वाटले,माझ्या सारख्या जुन्या पिढीच्या प्रतिनिधीला आमंत्रित केल्यामुळे तिने हे सारे केले असावे.पण जेवताना तीच म्हणाली,

“काकू मला हे फार आवडतं.या परंपरा इथे वाढणार्‍या माझ्या मुलांनाही कळायला हव्यात ना? शेवटी ना काकू ते काय म्हणतात ना,जुनं ते सोनं, तेच खरं!”

बरं वाटलं मला. कुठेतरी धागे अतूट

असल्यासारखे वाटले.

दरवर्षी आम्ही आमच्या गावी जातोच. खानदेशातले एक खेडेवजा शहर.तसा आता जुना वाडा राहिला नाही.तिथे राहणार्‍या भावांनी नव्या पद्धतीचे घर बांधले.अधुनिकीकरण केले. मात्र नवे जुने गळ्यात गळे घालून आहेत.

आम्ही गेलो की माझी जाऊ अंगणात मस्त चूल पेटवते.भांड्याला मातीचं बुड लावून ,त्यात एखादा सणसणीत रस्सा बनवते.लोखंडी तव्यावरच्या, चुलीच्या जाळावर शेकलेल्या,खरपूस गरम भाकर्‍या आणि खास लाकडी बडगीत ठेचलेला हिरव्या मिर्चीचा

ठेचा!तोडच नाही त्याला.आणखी एक.

चकचकीत घासलेल्या तांब्याच्या बंबातल्या कडथ पाण्याचे स्नान! सारेच अपूर्व!

गावात फेरफटका मारताना कुणी,

“राम राम पावनं!”म्हणताना ऐकले की,

हाय,हॅलो,व्हाट्सप,चि…ल,हे शब्द किती पोकळ वाटतात! गावरान शब्दातला गोडवाच न्यारा!

कोरोनाच्या काळात,सुरक्षित अंतर ठेवा,या नियमाचे पालन करताना आवर्जून सांगितले गेले,नको शेकहँड,नको मिठ्या,नको मुके.हात जुळवून केलेला नमस्कारच पुरे.मग ही तर भारतीयांची पूर्वापार चालत आलेली संस्कृती.

बाहेरुन आलेल्या माणसाने

घरात येण्यापूर्वी परसातल्या नळाखाली पाय धुवूनच यायचे..अशा कितीतरी

जुन्या विचारांची दारे पुन्हा उघडली आणि त्यातून सुवर्णमयी वारे वाहू लागले.”जुने जाऊद्या मरणालागूनी”

असे म्हणायच्या ऐवजी तेच जुने सोन्यासारखे वाटू लागले.

काल लेकीने व्हाॅट्सॲपवर फोटो पाठवले होते.

दोन शुष्क झाडाची खोडे ,शंकुच्या आकारात बार्बेक्यु ट्रेवर बाहेरच्या डेकवर ठेवली होती.त्यांना फुलापानांनी सजवले

होते. नारळ बांधला होता.पायाशी रांगोळी रेखाटली होती.होळीपूजनासाठी

तबक सजवले होते.पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला होता.

त्या पेटत्या नाविन्यपूर्ण होळीची चित्रं पाहताना मला खूप मजा वाटली.

खाली कॅप्शन होती.

“आमची अमेरिकन बार्बेक्यु होळी!”

हे विडंबन नव्हतं.एक गोड आनंदमयी अर्थपूर्ण संकेताचं ते पालन होतं.

अधुनिकतेत जुने सांभाळण्याची धडपड होती.मला खूप छान वाटले.

आयुष्याची,जुन्या नव्याची ही मिसळही मला खमंग रस्सेदार वाटली.

सृष्टीचाच नियम आहे.काहीच नाश

पावत नाही.होते ते फक्त स्थित्यंतर.

जुने—नवे—जुने हे एक चक्र आहे.

जुन्यातून नवे अन् नव्यातून पुन्हा जुनेच.

आणि मग आपण सहज म्हणतो,

“जुनं तेच सोनं!”

 

सौ. राधिका भांडारकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा