स्वर्गीय अजितदादा पवार यांना सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
सावंतवाडी :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार यांचे दिनांक 28 डिसेंबर 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे.
सामान्य कार्यकर्त्यांचे शांतपणे म्हणणे ऐकून घेणे आणि एकदा काम हाती घेतले की ते पूर्णत्वास नेणे, ही त्यांची नेतृत्वशैली होती. अशा प्रभावी आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याच्या जाण्याने देशाचे व राज्याचे मोठे नुकसान झाले असून कार्यकर्ते व जनता हतबल झाली आहे.
या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी व दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सावंतवाडी येथील तालुका पक्ष कार्यालयात शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेस तालुकाध्यक्ष उदयराव भोसले, पक्षाचे प्रदेश चिटणीस श्री. सुरेश गवस, एम. डी. सावंत, युवक कार्यकर्ते अनंतराज पाटकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, कामगार सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, शहर अध्यक्ष ऑगस्टीन फर्नांडिस, ॲड. सत्यवान चंदवनकर, दीपक देसाई, गुरुदत्त कामात, नंदकिशोर नाईक, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेंद्र देसाई, नितेश पाटील, शहाजीराव भोसले, राम लाखे, डॉ. तुषार भोसले, सौ. रंजना निर्मल, रामचंद्र निर्मल, शशिकांत तळवणेकर तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी एकत्र येत स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
