*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*मी रस्त्यावर पडलेला तिरंगा*
दचकलात न माझ्या आवाजाने? हो मीच बोलतोय रस्त्यावर पडलेला , भारताचा मानबिंदू —भारताचा तिरंगा !
तुम्हा लोकांचा हा स्वभावच आहे गरज सरो वैद्य मरो
काल दिवसभर मला सन्मान देणारे, माझ्यावर मोठमोठी भाषणे देणारे , विजयी विश्व तिरंगा प्यारा असं उत्साहाने मोठ्मोठयाने गाणारे, देशभक्तीने ओतप्रोत भाषणे देणारे यापैकी एकालाही माझी आठवण नाही गरज नाही माझ्याबद्दल आदर तर अजिबातच नाही असेच दृश्य सगळी कडे दिसते आहे.
माझे चित्र असलेले बॅज आज कोपऱ्यात केविलवाण्या अवस्थेत पडलेले पाहून माझ्या मनाला होणाऱ्या यातना तुम्हाला कशा कळणार?
काल २६तारखेला सगळेजण मला मिळविण्यासाठी धडपडत होते, शाळा कॉलेज सरकारी कचेऱ्या एव्हढेच काय पण टी व्ही वर सुद्धा मी दिमाखात विराजमान होतो. काल गेला आज कोणाला माझी गरज नाही आज मी अतिशय दीन अवस्थेत रस्त्याच्या कडेला नालीत, अर्थवट फाटलेल्या अवस्थेत कचरापेटीत दीनवाण्या स्थितीत पडलो आहे, काल रस्तोरस्ती मी तिरंगा वाटेल त्या किमतीत विकल्या जात होतो. सगळे रस्ते कसे फुलून गेले होते सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते
आता माझं काम संपलं, माझी गरजही संपली तुमच्या बेगडी प्रेमाचे वास्तविक दर्शन झालं. आज माझ्याकडे पाहायला कुणाला वेळ नाही, माझा सन्मान तर दूरच राहिला, एखाद्याच्या टेबलावर मी सहज दिसलो तरी मला पटकन तेथून हटवले जात आहे. वरून एक शेराही कशाला बिनकामाच्या वस्तूंचा कचरा जमा केला आहे इथे म्हणत! माझ्या बोलण्याचा राग नका करू पण ही वस्तुस्थिती आहे रे! आज कुणी मला सायकलवर, गाडीवर लावायला तयार नाही, ही कसली रे तुमची एक दिवसाची देशभक्ती ?
देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, माझा मान राखण्यासाठी शहिदांनी आपले रक्त सांडविले. अरे मी म्हणजे लोकशाहीची ओळख. केशरी पांढरा व हिरवा हे रंग तुम्हाला त्याग शौर्य,शांती सुचिता शिकविण्याचा प्रयत्न करतात, समृद्धीचा संदेश देतात. आज मात्र मी असहाय अवस्थेत इथे रस्त्याच्या कडेला पडलो आहे अनेक जागरूक नागरिक २६ जानेवारीनंतर माझा अपमान होऊ नये म्हणून प्रयत्न करतात, त्यांची चेष्टा केली जाते. माझे अस्तिव हा भारतीयांचा मानबिंदू ! पण
लक्ष्यात कोण घेतो?
माझा भारत महान माझा भारत, मी भारताचा हे नारे काय फक्त कालपूरतेच होते? गड्यांनो असं नका करू.
तुम्ही भाग्यवान की स्वतंत्र भारताचे तुम्ही नागरिक आहात सुजाण आहात, माझे अस्तित्व म्हणजेच तुमची आन बान आणि शान हे विसरू नका माझा अपमान अवहेलना ही जे देशासाठी लढले, शहीद झाले आपल्या रक्ताने ज्यांनी स्वतंत्र भारताचे
सोनेरी स्वप्न रेखाटले त्या सगळ्यांचा ,देशासाठी आपल्या पुत्राचे वीरमरण पाहणाऱ्या आणि हसत हसत स्वतःच आपल्या कपाळावरील कुंकवाने देशाचा इतिहास घडविणाऱ्या वीरांगनांचा अपमान होईल असे वर्तन करू नका, भावी पिढ्याना तुमचा अभिमान वाटावा असे तुमचे वर्तन असू द्या.जय हिंद जय भारत.
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
