सोनुर्ली माऊली देवीच्या दर्शनाने विक्रांत सावंत व सचिन बिर्जे यांचा प्रचाराचा श्रीगणेशा
सावंतवाडी :
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार विक्रांत सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांनी सोनुर्ली माऊली देवीचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. सोनुर्ली गावाच्या विकासासाठी मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी हाक यावेळी विक्रांत सावंत यांनी मारली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भाजप, मधून सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि युवा नेतृत्व विक्रांत सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर माजगाव पंचायत समितीसाठी सचिन बिर्जे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार घरोघरी जाऊन सुरू केला आहे. तरुण, तडफदार, सुशिक्षित उमेदवार म्हणून दोन्ही चेहरे भाजपकडून देण्यात आले आहेत.
या दोघांनाही जनतेमधून प्रचंड आशीर्वाद मिळत असून आज सोनुर्ली गावामध्ये श्रीदेवी माऊली देवीचे दर्शन घेत त्यांनी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी विक्रांत सावंत म्हणाले, जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासह पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे या दोघांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. जिल्हा परिषद मतदारसंघात जनतेचा मोठा पाठिंबा मला मिळत आहे. युवाशक्ती आणि जनतेचे आशीर्वाद हीच माझी ताकद असून सर्व मतदार बंधू-भगिनींनी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदारूपी आशीर्वाद आम्हाला द्यावेत आणि सोनुर्ली गावासह संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करण्याची संधी मला द्यावी.
आपण दिलेले प्रेम व आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही. तर पंचायत समिती ही गावाचा केंद्रबिंदू असून गावातील प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून मला पंचायत समितीवर निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मतदारूपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांनी केले.
यावेळी गावचे प्रमुख मानकरी बाळा गावकर, रमेश गावकर, दशरथ गावकर, सचिन गावकर, नागेश गावकर, रेश्मा सावंत, सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष ओटवणेकर, विष्णू नाईक, विजय पालकर, प्रवीण गाड, बबली मालपेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
