जिल्हा परिषद १ व पंचायत समिती ६ उमेदवारांची माघार; शेवटच्या तासाकडे सर्वांचे लक्ष
दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद एक आणि पंचायत समिती सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्ज माघारीसाठी अवघा एक तास शिल्लक राहिल्याने आणखी कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उबाठा) चे उमेदवार संजय कृष्णा गवस यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
मणेरी पंचायत समिती मतदारसंघात शिवसेना (उबाठा) चे विजय लाडू जाधव तसेच अपक्ष अजय श्रीकृष्ण परब यांनी माघार घेतली आहे.
तसेच कोनाळ पंचायत समिती मतदारसंघात अश्विनी उत्तम ठाकुर, कोलझर पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष शिरीषकुमार झिलू नाईक व दौलतराव महादेव देसाई, तर झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघात भाजपा-अपक्ष दीक्षा लक्ष्मण महालकर यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात राजकीय हालचालींना अधिकच वेग आला असून, वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या शिष्टाईमुळे आणखी माघारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेवटच्या तासात कोणते नवे निर्णय होणार, यावरून दोडामार्ग तालुक्यातील निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे.
