फोंडाघाटच्या आरोग्यसेवेत तीन पिढ्यांचे शतकी योगदान
डॉक्टर सुरेश आपटे यांचा व्यापारी संघ व कट्टा बैठकीच्या वतीने गौरव
फोंडाघाट
जवळजवळ ५० वर्षे फोंडाघाट व परिसरातील नागरिकांची अविरत सेवा करणारे ज्येष्ठ डॉक्टर श्री. सुरेश आपटे यांचा फोंडाघाट व्यापारी संघ व कट्टा बैठक यांच्या संयुक्त विद्यमाने यथोचित सत्कार करण्यात आला. औषधे स्वतः तयार करून रुग्णसेवा करण्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले असून त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
डॉक्टर सुरेश आपटे यांचे वडील हे देखील डॉक्टर होते. त्यांनी सुरू केलेली ही आरोग्यसेवेची परंपरा डॉक्टर सुरेश आपटे यांनी पुढे चालवली. सध्या तिसऱ्या पिढीत त्यांचे पुत्र डॉ. शैलेंद्र आपटे आणि सून हेही डॉक्टर म्हणून फोंडाघाटवासीयांची सेवा करत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत डॉ. शैलेंद्र आपटे रुग्णसेवेत कार्यरत असून, कोरोना काळातही कोणतीही भीती न बाळगता त्यांनी सेवा अखंडपणे सुरू ठेवली होती.
तीन पिढ्यांमधून सुमारे १०० वर्षे फोंडाघाटसारख्या ग्रामीण भागात दिलेले हे योगदान लक्षात घेता, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपटे कुटुंबाचा गौरव केला. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन डॉक्टर सुरेश आपटे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
यावेळी गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. संजना आग्रे यांनीही डॉक्टर आपटे यांचा सन्मान केला. या कार्यक्रमास व्यापारी संघाचे पदाधिकारी, कट्टा बैठकीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— अजित नाडकर्णी, शुभांजित श्रुष्टी
