*जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या हस्ते प्रवेश, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची उपस्थिती; माजी सरपंच विनोद राऊळ यांचा पुढाकार*
सावंतवाडी / नेमळे :
भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर विश्वास ठेवत नेमळे धनगरवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या हस्ते तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना संदिप गावडे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून धनगर समाजाच्या वाड्यांच्या विकासासाठी आजपर्यंत भरघोस निधी देण्यात आला आहे. यापुढेही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि धनगरवाडीचा सर्वांगीण विकास निश्चितपणे साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा पक्षप्रवेश नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या विशेष प्रयत्नातून घडून आला. कार्यक्रमास सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विलास गावडे, शक्तिकेंद्र प्रमुख गौरव मुळीक, गेळे सरपंच सागर ढोकरे तसेच नेमळे गावातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
