फोंडाघाट बिजलीनगर येथे शिवाजी तरुण मंडळाची भव्य सार्वजनिक पूजा संपन्न
फोंडाघाट
फोंडाघाट येथील बिजलीनगर परिसरात शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सार्वजनिक पूजा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाली. आकर्षक मकर सजावट आणि कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ यामुळे हा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
दुपारी ठीक १२ वाजता पूजा संपन्न झाल्यानंतर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अशा दोन शिस्तबद्ध रांगा लावून भाविकांना दर्शनाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी २ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. जवळपास ४ ते ५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपुलकीने व सेवाभावाने सर्वांना प्रसाद वाटप केले.
यावेळी अरुण सामंत यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “श्री सत्यनारायणाचे सर्व करून घेतो. ही सगळी त्याचीच किमया आहे. तसेच सर्वजण एकसंघपणे काम करतात, म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होतो.”
सायंकाळी भक्तिभावपूर्ण भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी नागरिकांना केले आहे.
— अजित नाडकर्णी, शुभांजित श्रुष्टी

