केंद्र शासनाचा पद्मश्री बहुमान मिळाल्याबद्दल
राष्ट्रसंतांचे वारसा चालविणारे वारकरी जनार्दनपंत बोथे
गणराज्य दिनानिमित्त दरवर्षी पद्मश्री पुरस्कार द जाहीर करण्यात येतात. यावर्षी आपल्या मोझरी येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस व राष्ट्रसंतांचे स्वीय सहाय्यक व फोटोग्राफर राहिलेले श्री जनार्दन पंत बोधे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानिमित्त
एक मुलगा लहानपणापासून राष्ट्रसंतांबरोबर राहतो. पुढे तो राष्ट्रसंतांचा फोटोग्राफर होतो. फोटोग्राफी बरोबर राष्ट्रसंतांच्या स्वीय सहाय्यकाचे काम करतो. राष्ट्रसंतानंतर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा सरचिटणीस होतो. आपल्या कर्तव्य तत्परतेने गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांचा वारसा प्रामाणिकपणे चालवितो. त्या माणसाचे नाव आहे श्री जनार्दनपंत बोथे. राष्ट्रसंतांचा वारसा चालविणारे जे काही मोजके लोक आज जिवंत आहेत त्यामध्ये बोथे दादांचा वाटा मोठा आहे. त्याला कारणही तसे आहे कारण की ते सदा सर्वदा राष्ट्रसंतांबरोबर राहिल्यामुळे राष्ट्रसंतांनी पेरलेले अंकुर त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये वृद्धिंगत झाले आहेत आणि त्यामुळे त्यांचे प्रत्येक कृती ही राष्ट्रसंतांच्या प्रतिबिंबासारखी आहे.
आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांच्या संपूर्ण भारतामध्ये 25000 च्यावर शाखा आहेत. महाराष्ट्रात तर आहेतच. पण महाराष्ट्र बाहेरही अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे विखुरलेले आहे. त्याचे प्रत्यंतर आपल्याला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये येते. संपूर्ण भारतातून मौन श्रद्धांजलीसाठी लाखोंच्या संख्येने लोक भक्त येतात. चार पाच तास त्या रोडवरची वाहतूक दुसऱ्या रोडने वळविण्यात येते. आता तर नवीन बायपासच तयार झालेला आहे. इतकी प्रचंड गर्दी राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवाला असते.
श्री जनार्दनपंत बोथे यांचे नाव आता सर्वतोपरी झालेले आहे. अतिशय विनम्र स्वभाव .खादीचे वस्त्र. डोक्यावर भगवी टोपी आणि भारतीय बैठक हे चित्र तुम्हाला पहावयास मिळेल .आज वयाची 86 वर्ष पूर्ण केली आहेत .तरीही त्यांचा उत्साह तरुणांसारखा आहे. सकाळी लवकर उठणे. ध्यान प्रार्थना करणे आणि साडेबारापर्यंत कार्यालयात बसणे. आलेल्या कामाचा निपटारा करणे. परत अडीच वाजता कार्यालयीन कामासाठी उपस्थित राहणे. जागोजागी विखुरलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखांना भेटी देणे. तिथल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे .हे त्यांचे कार्य गेल्या 75 वर्षांपासून सुरू आहे. पावसाळा उन्हाळा हिवाळा जरी असला तरी या कामांमध्ये खंड पडलेला नाही. आणि पडणारही नाही.
आज अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या सानिध्यात अनेक मंत्री अनेक आयएएस आयपीएस अधिकारी अनेक आमदार अनेक खासदार अनेक नगरसेवक अनेक लोकप्रतिनिधी आहेत. त्यातील काही तर गुरुदेव सेवा मंडळातूनच घडलेले आहेत. जो माणूस जो विद्यार्थी गुरुकुंज मोझरी येथे शिक्षण घेतो किंवा मानव सेवा वस्तीगृहात राहतो .त्याला वेगळ्या चारित्र्य प्रमाणपत्राची गरज नाही. इतकी शिस्त श्री जनार्दन पंत बोथे गुरुजी यांनी गुरुकुंजला लावली आहे. तुम्ही त्यांच्या सहवासात आले तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की ते एक शब्दही बोलत नाहीत. पण सगळी काम आपोआप होतात. ते डोळ्याने बोलतात हाताने बोलतात आणि लोक त्यांचे अनुकरण करतात. तुम्ही जर गुरुकुंज मोझरी येथे गेले तर तुम्हाला असे दिसेल की मुले काम करीत आहेत. मुले प्रार्थना करीत आहेत. मुलं लोकांना सूचना करत आहेत .परंतु कोणीही बोलत नाही. सगळे काम इशारावर चालते आणि ही अभूतपूर्व देणगी श्री बोथे दादांनी तिथल्या कार्यकर्त्यांना तिथल्या लोकांना दिलेली आहे .
आमची बरीचशी शिबिरे आमचे बरेचसे साहित्य संमेलन आमचे बरेचसे कार्यक्रम हे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरीच्या स्मृती मंदिरात होतात. या कार्यक्रमासाठी दादांनी आम्हाला गुरुकुंज मोझरीच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांनी त्यांची दारे आमच्या उपक्रमासाठी सदैव उघडी करून दिलेली आहेत. त्यांचे म्हणणे आहे या निमित्ताने साहित्यिक आयएएस अधिकारी आमच्याकडे येतील. राष्ट्रसंतांचा विचार त्यांच्या गावात जातील घेऊन जातील. त्यामुळे तुम्हाला जेवढे कार्यक्रम घ्यायचे आहेत. तेवढे आमच्या आश्रमातच घ्या. असा त्यांचा आग्रह असतो आणि आम्ही त्यांच्या त्या सूचनांचे पालन करतो .
दादांना प्रसिद्धीचा हव्यास नाही. स्टेजवर बसण्याची प्रवृत्ती नाही. ते इतरांना पुढे करतात. स्वतः मागे राहतात .एवढा मोठा पुण्यतिथी महोत्सव किंवा राष्ट्रपती मुख्यमंत्री येवोत दादा सरचिटणीस असले तरी पुढे पुढे करणार नाहीत. ज्यांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी तो पार पडेल असा त्यांनी पायंडा घालून दिलेला आहे. म्हणून ते प्रसंगी पुष्पाताईंना म्हणतील .कधी प्रकाश महाराज वाघ यांना म्हणतील. कधी मला पण म्हणतील की काठोळे ही जबाबदारी तुम्ही सांभाळा आणि आम्ही ती जबाबदारी त्यांचे पाईक म्हणून स्वीकारतो आणि पार पाडतो .
आज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा विस्तार खूप मोठा झालेला आहे. आयुर्वेद महाविद्यालय आहे .आयटीआय आहे .शाळा आहे. वस्तीगृह आहे. ज्ञानमंदिर आहे .मासिक आहे. प्रिंटिंग प्रेस आहे .वृद्धाश्रम आहे. सर्व काही आहे .पण हे सर्व सुरळीत सुरू आहे याचे सगळे श्रेय श्री बोथे दादा व त्यांचे एकनिष्ठ सहकारी यांनाच आहे. त्यामुळे हा डोलारा व्यवस्थितपणे राष्ट्रसंतांनी आखून दिलेल्या मार्गावरून जात आहे. अनेक वेळा मोठी माणसे निघून गेली की त्यांची अनुकरण करणारे आपापले मार्ग शोधतात. पण बोथे दादा त्याला अपवाद आहेत .राष्ट्रसंतांनी दाखविलेल्या मार्गावरून ते मार्गक्रमण करीत आहेत आणि म्हणूनच या 86 व्या वर्षी देखील त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांनी जेव्हा वयाची 75 ही पूर्ण केली. त्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. अगदी साधा समारंभ झाला. कुठलाही बडे जावपणा नाही .खरं म्हणजे आजकाल आपले वाढदिवस आपले सत्कार मोठ्या प्रमाणात मोठ्या मंगल कार्यालयात साजरी करण्याचचा एक नवीन पायंडा पडत आहे. पण दादा त्याला अपवाद आहेत.
मी त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही राष्ट्रसंतांच्या सहवासात इतके दिवस राहिलेत तर तुम्ही तुमचे अनुभव लिहून काढा .वाटल्यास मी तुम्हाला लेखनिक देतो .पण दादा विनम्रपणे म्हणाले. राष्ट्रसंत हे सर्व श्रेष्ठ आहेत. त्यांचे विचार म्हणजेच माझे माझे विचार आहेत .मी वेगळे काय सांगणार. स्वतःचे आत्मचरित्र देखील लिहायला हा माणूस तयार नाही. यात त्यांचे मोठेपण आहे .नाहीतर आज उठल्या पडल्या लोक आत्मचरित्र लिहायला लागलेले आहेत. आणि स्वतःचाच गौरव स्वतःच करून घ्यायला लागलेले आहेत. दादा त्याला अपवाद आहेत. त्यांच्या ह्या कामाची दखल केंद्र शासनाने घेतली व त्यांना यावर्षी गणराज्यदिवशी जाहीर होणारा पद्मश्री पुरस्कार घोषित करून त्यांच्या कार्याला न्याय दिला त्यानिमित्त त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
