आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अजित दिघे यांची महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण समितीवर नियुक्ती
वैभववाडी
आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वैभववाडी चे प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अजित दिघे हे गेली चार वर्षे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या करिअर कट्टा विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.याच विभागामार्फत
महाराष्ट्र राज्यातील युवकांना कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि करियर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मधुर समन्वय – मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रकल्पासंदर्भात महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून महाराष्ट्रात मधुर क्रांतीच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या कराराच्या वेळी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण क्रांतीची सुरुवात होणार आहे. या उपक्रमाच्या गुणवत्ता व नियंत्रणासाठी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली असून या नियामक मंडळांमध्ये डॉ. अजित दिघे (सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
