सावंतवाडी :
सावंतवाडी येथील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच जानकीबाई सुतिका गृह या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या उपाध्यक्षपदी अमोल दत्ताराम सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या पदावर यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राणी पार्वती देवी हायस्कूल संस्थाचे अध्यक्ष विकास सावंत हे अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांच्या रिक्त जागेवर त्यांचेच नातेवाईक असलेल्या अमोल सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
अमोल सावंत यांनी यापूर्वी माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले असून त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या निवडीमुळे महाविद्यालय व संबंधित संस्थांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ही निवड संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर व संचालक मंडळाने केली असून, सूचक म्हणून उमाकांत वारंग तर अनुमोदक म्हणून गुरुदास मठकर यांनी भूमिका बजावली. या निवडीबद्दल राणी पार्वती देवी हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत, संचालक मंडळ तसेच मित्रमंडळाने अमोल सावंत यांचे अभिनंदन केले आहे.
