*न्हावेली पंचायत समिती निवडणूक*
शक्ती प्रमुखासह न्हावेली गावातील भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता न्हावेली पंचायत समिती मतदारसंघातून भाजपची अधिकृत उमेदवारी दिली गेल्याने, स्वकीयांच्याच नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रचारात सहभाग न घेण्याचा निर्णय येथे भाजप कार्यकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान, २७ जानेवारीनंतर भाजप सदस्य पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचेही समजते. न्हावेली ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपचा सरपंच बसला होता. त्यापूर्वी अनेक वर्ष या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती. भाजपचे शक्ती प्रमुख अजित चौकेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय दळवी, राजन कालवणकर, रमेश निर्गुण यांच्या संघटन कौशल्यामुळे न्हावेली गावात भाजपने वर्चस्व मिळविले होते.
पंचायत समिती निवडणुकीसाठी एक मताने उमेदवार देण्याचा निर्णय झाला असताना, आयत्यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष महेश सारंग यांनी तुमच्या सरपंचांना उमेदवारी दिली, त्यांचा प्रचार करावा लागेल असे सांगितल्याने भाजपा कार्यकर्त्यात तीव्र नाराजी आहे.
न्हावेली पंचायत समिती मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार अंकित धाउस्कर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून शरद धाऊस्कर, रमेश निर्गुण, नितीन पालेकर रिंगणात आहेत.
दरम्यान, इतर कार्यकर्त्यांनाही संधी मिळायला हवी, यासाठी शक्ती प्रमुख अजित चौकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश निर्गुण, नितीन पालेकर यांची नावे समोर आली होती. दोघांपैकी एकाच्या नावावर गावपातळीवर शिक्कामोर्तब होत असताना, विश्वासात न घेता महेश सारंग यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने भाजपा कार्यकर्त्यात तीव्र नाराजी आहे.
