भिरवंडेतील श्री देव रामेश्वर मंदिरात 25 जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या भिरवंडे गावच्या ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शुद्ध रथसप्तमीपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 25 जानेवारी ते रविवार, 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा सप्ताह भक्तीभावात साजरा होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारपासून संपूर्ण भिरवंडे गाव भक्तीरसात न्हावून निघणार आहे.
कणकवलीपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर, सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात वसलेले श्री देव रामेश्वर मंदिर सध्या नूतन वास्तूच्या कामामुळे अधिक आकर्षक स्वरूपात उभे राहत आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराने वेगळी ओळख निर्माण केली असून, दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. हरिनाम सप्ताहाच्या काळात तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी गर्दी उसळते. या काळात गावात जणू प्रति पंढरपूर अवतरल्याचा अनुभव येतो.
रविवार, 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता मंदिरात घटस्थापना होऊन अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. सप्ताह कालावधीत नामवंत भजनी बुवांची भजने, वारकरी दिंडी, संगीत भजने, भावगीत, सुगम संगीत तसेच चित्ररथांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज रात्री 12 वाजता श्री देव रामेश्वराची सवाद्य पालखी मंदिर प्रदक्षिणा होणार असून, हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
सप्ताहानिमित्त 26 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थ, चाकरमानी मंडळी तसेच पाहुणे भक्तीभावाने या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह हा सर्वांसाठी भावभक्तीचा महासोहळा ठरतो.
सप्ताहातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये 25 जानेवारी रोजी संगीत भजन, 26 ते 31 जानेवारीदरम्यान महिला भजने, वारकरी दिंडी भजने, चित्ररथ, भावगीत व सुगम संगीत असे विविध कार्यक्रम होणार असून, 29 जानेवारी रोजी एकादशी महोत्सव विशेष भक्तीभावात साजरा केला जाणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन देवालये संचालक मंडळ, भिरवंडे व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
