सावंतवाडी, ता. २३ :
उपजिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर एवाळे यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक या पदावर बढती देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे महत्त्वाचे पद रिक्त होते. राज्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या मान्यतेने डॉ. एवाळे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे रुग्णालयाला पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी मिळाला आहे.
या नियुक्तीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच युवराज लखमराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या रिक्त पदाचा प्रश्न सुटला आहे.
डॉ. ज्ञानेश्वर एवाळे हे गेल्या ३० वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्त्रीरोग तज्ञ म्हणून अविरत सेवा बजावत आहेत. १९९६ पासून त्यांनी सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांमध्ये दरमहा सरासरी १०० प्रसूती केसेस यशस्वीरीत्या हाताळल्या आहेत. त्यांनी १९९८ ते २००६ या काळात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात, त्यानंतर २००६ ते २०१६ पर्यंत दोडामार्ग येथे आणि २०१७ ते २०२३ या काळात पुन्हा दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात सेवा दिली आहे. २०२३ पासून ते पुन्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत.
त्यांचा प्रदीर्घ अनुभव, प्रामाणिक सेवा आणि माता-शिशु आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही पदोन्नती देण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल वैद्यकीय वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्यातून डॉ. एवाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
