देवगड तालुक्यात भाजपचा दबदबा; पाच जागांवर बिनविरोध विजय
अर्ज माघारीमुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपला मोठे यश
देवगड
देवगड तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे पाच जागांवर थेट बिनविरोध निकाल लागला आहे. या सर्व जागांवर भाजपच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाल्याने देवगड तालुक्यात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पडेल जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या सुयोगी रविंद्र घाडी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उबाठा)च्या स्नेहल सत्यवान मेस्त्री आणि अपक्ष उमेदवार अंकिता सुहास वाडेकर यांनी अर्ज मागे घेतले.
पडेल पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे अंकुश यशवंत ठूकरूल बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उबाठा)चे शशांक शरद तावडे आणि अपक्ष उमेदवार सुहास वसंत वाडेकर यांनी माघार घेतली.
नाडण पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे गणेश सदाशिव राणे यांचा बिनविरोध विजय झाला आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष मकरंद यशवंत जोशी आणि शिवसेना (उबाठा)चे सुहास वसंत वाडेकर यांनी अर्ज मागे घेतले.
बापर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या अवनी अमोल तेली या बिनविरोध निवडून आल्या असून त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या रेश्मा रविंद्र सावंत यांनी अर्ज मागे घेतला.
तसेच बापर्डे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या संजना संजय लाड या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उबाठा)च्या सुलोचना सिताराम धुरी यांनी माघार घेतली.
अर्ज माघारीच्या प्रक्रियेमुळे या पाचही मतदारसंघांमध्ये निवडणूक न होता थेट बिनविरोध निकाल लागला असून देवगड तालुक्यात भाजपला मोठे राजकीय यश मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
