शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस;
माजी खासदार निलेश राणे यांनी केला निषेध
मालवण
राज्य शासनाने शिवजयंती उत्सवावर बंधने घातल्यानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग वर शिवजयंती थाटामाटात साजरी करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर उद्या सिंधुदुर्ग वर होणाऱ्या शिवजयंतीबाबत साऱ्यांचीच उत्कंठा वाढली आहे. दरम्यान पोलिसांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना एका नोटिशीव्दारे शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याबाबत सूचना देताना जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान भाजपा नेते निलेश राणे आणि आमदार वैभव नाईक हे सकाळी किल्ले सिंधुदुर्गवर आपआपल्या कार्यकर्त्यांसमवेत जाऊन शिवराजेश्वर मंदिरात शिवपूजन करणार असल्याचे भाजप शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात नेत्यांचे पुतळे जाळण्याच्या प्रकारांमुळे राजकीय वातावरण आणखीनच तापले. याच दरम्यान कोरोनामुळे शिवजयंती उत्सवावर ठाकरे सरकारने काही निर्बंध घातल्याबाबत भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त करत १९ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा मनोदय जाहीर करत हिंमत असेल तर अडवून दाखवा असे आव्हान शिवसेना व ठाकरे सरकारला दिले होते. या इशाऱ्या नुसार उद्या १९ रोजी सकाळी दहा वाजता निलेश राणे व भाजप कार्यकर्ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेकडून आमदार वैभव नाईक हे उद्या सकाळी नऊ वाजता किल्ले सिंधुदुर्गवर शिवसैनिकांसह शिवजयंती उत्सव साजरा करणार आहेत.