फोंडाघाट पंचक्रोशीतील जनतेचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध – अनंत पिळणकर
कणकवली :
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघ हा गेली कित्येक वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत आहे. या मतदारसंघात अनेक ज्वलंत प्रश्न असून ते सोडविण्यासाठी मी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्यानुसार मला उमेदवारी मिळाली असून, निवडून आल्यानंतर फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष तसेच फोंडाघाट जि. प. मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी दिली.
फोंडाघाट येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नयन गावडे, काँग्रेसचे संतोष टक्के, चेतन्य सावंत, उबाठा शिवसेना उपतालुकाप्रमुख संजना कोलते, विभागप्रमुख सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.
अनंत पिळणकर म्हणाले, फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अद्यापही सुसज्ज क्रीडांगण आणि गार्डनची कमतरता आहे. निवडून आलो तर या भागात सुसज्ज अशी स्पोर्ट्स अकॅडमी उभारण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच या मतदारसंघातील खड्डेमय रस्ते आणि हायवेची बिकट अवस्था यासारख्या समस्या आहेत. आतापर्यंत सत्तेत असलेल्यांनी केवळ रस्ते बनवले, मात्र जिथे विरोधी पक्षाची मंडळी कार्यरत आहेत तेथे हेतुपुरस्सर विकासकामे झाली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. मात्र मी कोणताही द्वेष न ठेवता चांगले काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक दुर्गम भाग असून तेथे अद्याप स्ट्रीट लाईटची सुविधा नाही. त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्याचा प्रयत्न केला जाईल. येथे अनेक बचत गट कार्यरत असून त्यांच्यासाठी सातत्याने कार्यशाळा घेतल्या जातील, असेही पिळणकर म्हणाले.
फोंडाघाट बाजारपेठेत रस्त्याचे काम सुरू असले तरी पर्यायी मार्गाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. घाट मार्गातील सुरू असलेली कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. याबाबत ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. देवगड–निपाणी रस्ता कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, निवडून आल्यानंतर ही सर्व कामे चांगल्या दर्जाची होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पिळणकर यांनी स्पष्ट केले.
पिळणकर पुढे म्हणाले, फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाला सातत्याने एकाच ठिकाणचे उमेदवार लाभल्यामुळे अपेक्षित विकास झाला नाही. यासाठीच मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिलेल्या शब्दानुसार मला उमेदवारी जाहीर झाली.
या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. फोंडाघाट गावातील नागरिकांना अनेक वर्षांपासून अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. लोरे तलावातील पाणी काढून ते विहिरीत सोडून, त्यानंतर टाकीत भरले जाते. हेच पाणी ग्रामस्थ वापरत आहेत. या प्रकरणाची शासकीय यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर फोंडाघाटवासीयांना शुद्ध पाणी देण्यासाठी कटिबद्ध राहीन, असे त्यांनी सांगितले.
या मतदारसंघात आरोग्याचाही मोठा प्रश्न आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयी-सुविधांचा अभाव असून रुग्णांना कणकवली उपजिल्हा रुग्णालय, ओरोस जिल्हा रुग्णालय किंवा गोवा येथे जावे लागते. त्यामुळे फोंडाघाट येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पिळणकर म्हणाले.
ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार असून ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असेल. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करणार नाही, असेही अनंत पिळणकर यांनी स्पष्ट केले.
