You are currently viewing जिद्द, अभ्यास आणि स्वप्नांचा प्रवास इथेच थांबला

जिद्द, अभ्यास आणि स्वप्नांचा प्रवास इथेच थांबला

नीट टॉपर सिद्धी भिडेचे निधन

सावंतवाडी / बांदा :

बांदा-रामनगर येथील सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे शुक्रवारी सकाळी दु:खद निधन झाले. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी दीर्घकाळ झुंज देत सिद्धीने समाजासमोर जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण उभे केले होते.

रक्ताचा कर्करोग आणि त्यानंतर ब्रेन कॅन्सर अशा कठीण आजारांचा सामना करतानाही सिद्धी कधीच डगमगली नाही. उपचार सुरू असतानाही तिने आपल्या अभ्यासात सातत्य ठेवले. तिच्या अपार मेहनतीचे फळ तिला नीट परीक्षेत ६६४ गुण मिळवून कोकण विभागात अव्वल ठरून मिळाले होते.

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सिद्धी शेवटपर्यंत आपल्या ध्येयासाठी झटत राहिली. तिच्या संघर्षातून अनेक रुग्ण, विद्यार्थी आणि पालकांना आशा व प्रेरणा मिळाली होती. सिद्धीच्या निधनाने एक जिद्दी, गुणवान आणि असामान्य संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

आज तिच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार, शिक्षकवर्ग तसेच बांदा पंचक्रोशीतील नागरिकांनी तिच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दुपारी बांदा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिद्धी ही बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष तसेच भिडे कोचिंग क्लासेसचे संचालक शिवानंद भिडे यांची कन्या होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा