फोंडाघाटमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय रणधुमाळी;
युतीमुळे अपक्ष उमेदवारांचा पूर
फोंडाघाट –
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांची अधिकृत युती झाल्याने अपेक्षित तिकिटे न मिळाल्यामुळे विविध पक्षांतील इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने फोंडाघाट परिसरात राजकीय वातावरण तापले आहे.
अधिकृत युतीकडून जिल्हा परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाचे बबन हळदीवे तर पंचायत समितीसाठी भाजपकडून पवन भालेकर यांनी अर्ज भरले आहेत. याशिवाय राजा चिके आणि संतोष कानडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंचायत समितीसाठी सुभाष सावंत आणि राजा शिरोडकर यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
दुसऱ्या गटाकडून जिल्हा परिषदेसाठी अनंत पिळणकर तर पंचायत समितीसाठी सागर भोवड आणि सावंत यांनी अर्ज दाखल केले आहेत. आज होणाऱ्या छाननीनंतर कोणाचे अर्ज कायम राहतात, हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युतीमुळे अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी नाराज झाल्याचे चित्र असून त्यातूनच ही निवडणूक प्रत्येक उमेदवाराने प्रतिष्ठेची केली आहे. सर्वच उमेदवार स्थानिक पातळीवर प्रभावी असल्याने निवडणुकीचा निकाल अटीतटीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी फोंडाघाट परिसरात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले असून कोणाचे पारडे जड ठरेल, हे सांगणे कठीण झाले आहे.
अजित नाडकर्णी,शुभांजित श्रुष्टी
