बंडखोरीमुळे राजकीय हालचालींना वेग
सावंतवाडी / माजगाव : माजगाव पंचायत समिती मतदारसंघात महायुतीत बंडखोरी उफाळून आली असून, शिंदे शिवसेनेचे नेते आबा सावंत यांनी पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या असून, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
महायुतीच्या बैठकीत आपल्याला सहभागी करून न घेतल्याने आपण ही बंडखोरी करत असल्याचे आबा सावंत यांनी स्पष्ट केले. “लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या बंडखोरीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, बंडोबांना थंड करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार हे निश्चित मानले जात आहे. आगामी तीन ते चार दिवसांत ज्येष्ठ नेते कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
माजगाव पंचायत समिती मतदारसंघातील ही घडामोड आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, महायुतीच्या अंतर्गत समन्वयाचीही कसोटी पाहणारी ठरणार आहे.
