माजी जि.प. अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेनेचा (शिंदे गट) ठाम पाठिंबा
कुडाळ :
जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येत असतानाच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यांनी आज आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातून मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत या महत्त्वाच्या मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली आहे.
दीपलक्ष्मी पडते यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवताना प्रभावी कामगिरी केली आहे. संपूर्ण जिल्ह्याची भौगोलिक माहिती, प्रशासनावर मजबूत पकड तसेच महिला व ग्रामीण जनतेशी असलेला थेट संपर्क ही त्यांची मोठी ताकद मानली जाते. याच अनुभवाची दखल घेत पक्षाने त्यांना पुन्हा एकदा निवडणूक मैदानात उतरवले आहे.
अनुभवी चेहरा मैदानात उतरल्याने आंब्रड जि.प. मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना दीपलक्ष्मी पडते यांनी, “पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला साथ देत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे सांगितले. त्यांच्या उमेदवारीमुळे आंब्रड मतदारसंघात निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
