तळवडे मतदारसंघात भाजपला धक्का :
बाहेरील उमेदवाराविरोधात प्रमोद गावडेंची अपक्ष उमेदवारी
सावंतवाडी –
जिल्हा परिषद निवडणुकीत तळवडे मतदारसंघात भाजपकडून स्थानिक उमेदवाराला डावलून बाहेरील उमेदवार देण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. या निर्णयाविरोधात निरवडे गावचे माजी सरपंच व खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंचायत समितीच्या माजी सभापती प्रियांका गावडे यांचे ते पती असून प्रमोद गावडे यांना मानणारा मोठा समर्थकवर्ग आहे. या मतदारसंघात शिवसेनाही इच्छुक होती; मात्र जागा भाजपकडे गेल्याने शिवसैनिकांची पुढील भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, “आज वेळ कमी आहे, पुढील निर्णय प्रत्यक्ष भेटीत घेऊ,” अशी प्रतिक्रिया श्री. गावडे यांनी दिली आहे. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे भाजपचे उमेदवार संदीप गावडे यांच्यासमोर थेट आव्हान उभे राहिले आहे.
या घडामोडींमुळे भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत मिळत असून, ते शांत करण्यासाठी पक्षनेतृत्वाला हस्तक्षेप करावा लागणार आहे. मात्र, स्थानिकांना डावलल्याने निर्माण झालेल्या असंतोषावर प्रमोद गावडे आपली भूमिका बदलणार की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
