वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी आज मंगळवार, २० जानेवारी रोजी दुपारी भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे सादर करण्यात आला.
यावेळी भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, भाजप पदाधिकारी प्रशांत प्रभुखानोलकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आज मंगळवारी पाचव्या दिवशी एकूण २ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये चंद्रहास उमेश पांडजी – रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात आला आहे. आज अखेर एकूण १६२ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.
