कणकवली :
भाजपने कासार्डे येथील उद्योजक संतोष पारकर यांना ए.बी. फॉर्म देत जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी निश्चित केली आहे. तर नांदगाव पंचायत समितीमधून मागील निवडणूक लढवलेले हर्षदा वाळके यांना पुन्हा संधी देण्यात आली असून कासार्डे पंचायत समितीसाठी सहदेव उर्फ अण्णा खाडये यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात कासार्डे, ओझरम, दारुम या तीन गावांचा एक पंचायत समिती मतदारसंघ असून नांदगाव, तोंडवली, बावशी, असलदे, कोळोशी, आयनल या गावांचा दुसरा पंचायत समिती मतदारसंघ आहे. या मतदारसंघात यावेळी ओबीसी सर्वसाधारण आरक्षण असल्याने अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्याच्या तयारीत होते.
नांदगाव पंचायत समितीमध्ये ओबीसी आरक्षण असून सभापती पद ओबीसी महिला असल्याने तसेच नाटळ पंचायत समितीमध्येही ओबीसी महिला आरक्षण असल्यामुळे या दोन्ही पंचायत समित्यांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
मागील वेळी कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसकडून संजय देसाई आणि भाजप–सेना युतीकडून संजय पाटाडे यांच्यात थेट लढत झाली होती. त्या निवडणुकीत संजय देसाई यांचा विश्वासार्ह मतांनी विजय झाला होता. यावेळी मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देत भाजपने राजकीय गणिते बदलण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र स्पष्ट होत असून येणारी निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
