भाजपकडून अधिकृत उमेदवारी, समर्थकांची मोठी गर्दी
सावंतवाडी :
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व आणि शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी अधिकृत उमेदवारी दाखल केली आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विक्रांत सावंत यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.
दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तीनही तालुक्यांत शिक्षण, आरोग्य, कला व क्रीडा क्षेत्रात विक्रांत सावंत यांनी सातत्याने भरीव काम केले आहे. त्यांची कार्यपद्धती, जनतेशी थेट संवाद आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशानंतर भाजप-अन महायुतीची ताकद त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असून त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
विक्रांत सावंत यांच्या उमेदवारीमुळे माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढली आहे. प्रगतशील आणि सर्वसमावेशक विकासाचा चेहरा म्हणून मतदारांचा कौल त्यांच्याकडे झुकताना दिसत असून ही निवडणूक मतदारसंघाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
माजी आरोग्य मंत्री स्व. भाईसाहेब सावंत व माजी आरोग्य सभापती स्व. विकास सावंत यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला. माजगाव, सोनुर्ली, वेते, चराठे, ओटवणे, सरमळे ग्रामस्थांचा आशीर्वाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सरपंच आबा सावंत, माजी सरपंच उमेश गावकर, माजी सरपंच उत्कर्ष गावकर, संजू कानसे, अॅड. सचिन गावडे, आर. के. सावंत, बाळू निचम, प्रा. बाळासाहेब नांदिहळ्ळी, प्रतीक सावंत, अखिलेश कानसे, प्रा. केदार म्हस्कर, शुभम रेडकर, अमेय पै, सचिन बिर्जे, सुरेश सावंत, विशाल लाड, संजय गावडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
