You are currently viewing अष्टमूडी लेक / जटायूशिल्प

अष्टमूडी लेक / जटायूशिल्प

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम प्रवास वर्णन*

 

*अष्टमूडी लेक / जटायूशिल्प*

 

केरळ राज्यातील अष्टमुडी विशाल झील…अष्ट म्हणजे आठ आणि मुडी म्हणजे वेणी किंवा शाखा…याचा आकार हाताच्या पंजासारखा किंवा एखाद्या मोठ्या पानासारखा असुन त्याला आठ शाखा फुटल्या आहेत. म्हणून हे अष्टमूडी झील.

 

यावेळेस पूर्वी अपूर्वाई असलेला, कमी वेळात पोहोचविणारा पण एकाच जागी बसून राहावा लागणारा हवाई विमानप्रवास किंवा गाडीतून रस्त्याने हवं तेव्हा हवं तिथे उतरता येणारा प्रवास टाळुन रेल्वेने हालता फिरता येणारा, जरासा जास्त वेळ लागणारा प्रवास करायचा होता…त्यामुळे बच्चे कंपनी खुश होती.

 

चेन्नई सेंट्रलहुन रात्री साडेसात वाजता आम्ही चौघेजण अष्टमूडी महिंद्र क्लब येथे जाण्यासाठी निघालो. सोबत आमचे फॅमिली फ्रेंड आणि त्यांची दोन मुलं होते. महाराष्ट्रातील संक्रांत म्हणजे तामिळनाडूतील आणि केरळच्या तामिळनाडू लगतच्या भागातील पोंगल हा अतिशय महत्वाचा सण…

 

या सणाच्या तीन चार दिवसात सुप्रसिद्ध आणि काही कारणाने गाजलेल्या केरळमधील ‘शबरीमाला’ येथे मोठा उत्सव साजरा केल्या जातो. त्या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांना बरेच आधीपासून / चाळीस दिवस पूर्वी पासून काही खूप कडक बंधनं पाळावी लागतात. त्यामुळे स्टेशनवर आणि गाडीतही काळे कपडे परिधान केलेल्या, सोबत भगव्या रंगाच्या कपड्यात पुजा साहित्य घेतलेल्या आणि प्रवासात सुध्दा अनवाणी पायाने चालणाऱ्या भाविकांची बरीच गर्दी होती.

 

यावेळी प्रवासाची सुरुवातही काही कारणाने जराशी घाई गडबडीतच झाली. फक्त तीन मिनिटांचा उशीर…आणि समोर लोकल उभी… तीही तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर…

जिला दादरा चढून तर काय पण रूळ ओलांडून गाठणंही शक्य नव्हतं…मग काय! तीन दीर्घ श्वास घेतले आणि अर्ध्या तासानंतरच्या पुढच्या लोकलची वाट पाहत उभे राहिलो. आणि ही लोकल मात्र आली दहा मिनिटं उशिरा…आता सेंट्रल स्टेशनवर जे दीड तास आधी पोहचलो असतो ते जेमतेम अर्धा तास आधी पोहचणार होतो. आणि लोकलच्या स्टेशनवरून चेन्नई सेंट्रलला पोहोचावं लागणार होतं…इथे मात्र दादरा किंवा लिफ्टची गरज नव्हती…कारण चेन्नई हे सापेक्षतेने पहिलं किंवा शेवटचं स्टेशन आहे…चलता है…

 

गाडीत वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेले

बर्थस् एकाच ठिकाणी मिळावेत यासाठी विनंतीवजा केलेले प्रयत्न, बऱ्याच अंशी यशस्वी ठरले आणि आम्ही हुश्श म्हणेस्तोवर साडेसातला गाडी निघाली सुद्धा.

 

अर्ध्या रात्री मात्र कुठल्याशा स्टेशनवरून चढलेलं एक जोडपं ‘उठा, उठा, ह्या दोन सीट्स आमच्या आहेत असं म्हणून मुलांना उठवायला लागलं. त्यांना आमची कन्फर्म तिकीटं दाखवली, मग त्यांनीही आपली तिकीटं दाखवली…तीही कन्फर्मच…दोन्ही बाजू आपापल्या मतावर म्हणजे तिकिटांवर ठाम…कल्पना करा, मध्य रात्र उलटून गेलेली, सारे प्रवासी गाढ झोपेत…आणि ‘आमच्या सीट्स- आमच्या सीट्स’ वरून चाललेली ‘तू तू मै मै’…अखेर आमचा गाडी नंबर सांगितला आणि त्यांच्या मोबाईलमधून त्यांच्या गाडीचा नंबर बघितला मात्र… मुलांनी कपाळावर हात मारून घेतला…कारण तेव्हा कळलं की ते त्यांच्या गंतव्य स्थानाकडे जाणाऱ्या गाडीऐवजी चुकून उलट्या बाजूला जाणाऱ्या गाडीत बसले आहेत…मुलांच्या झोपेचं तर फक्त खोबरंच झालं…पण पुढे त्यांचं काय झालं किंवा त्यांनी काय केलं ते कळलं नाही…कदाचित पुढच्या स्टेशनवर उतरले असावेत. त्यांच्यापुढे दुसरा पर्याय तरी काय होता बरं! असो.

 

सकाळी साडेआठ वाजता कोट्टायम आलं आणि गाडीतले सगळे कृष्णवस्त्रधारी आपलं अगदी अत्यल्प असलेलं सामान घेऊन खाली उतरले आणि शबरीमलासाठी चालू लागले. आता गाडी एकदम रिकामी झाली होती. आपल्याकडे शिर्डीला जाणारे भाविक नागरसोलला उतरल्यावर जशी होते तशी…आमचंही इच्छित स्थान म्हणजे पुढचं स्टेशन कोलम येऊ घातलं होतं. साधारण पंधरा-वीस मिनिटं बाकी राहिल्यावर त्या बेताने आम्ही सामानाची आवराआवर सुरू करणार तोच पुढच्या दोन-तीन मिनिटात गाडी स्टेशनवर आली सुद्धा…एकदा स्टेशनच्या नावाची खात्री केली…मग आमची तारांबळ काय विचारता! राहिलेलं चिल्लर सामान‌…नॅपकिन, चपला, बुटांसकट जमेल तसं आपल्या हातात घेऊन, चपला बूटं दारातूनच प्लॅटफॉर्मवर फेकून, गाडीतून खाली उतरायची एकच धांदलघाई उडाली. कारण गाडी वेळेपूर्वीच दहा मिनिटं आली असली तरी ती नेमकी किती वेळ थांबेल याची माहिती नव्हती. खाली उतरल्यावर रुळावर पडलेल्या एका बुटासह सगळं सामान एका ठिकाणी गोळा केलं आणि गाडीकडे बघत हसत सुटलो. नंतर कळलं की पुढचं ‘तिरुअनंतपुरम’ हा या गाडीचा शेवटचा थांबा असल्यामुळे तिला वेळेपूर्वी त्या स्टेशनवर प्रवेश नाही. म्हणून ती येथेच थांबवल्या गेली आहे. अशा गंमतीजमतींचा अनुभव घेत सकाळी साडेनऊ वाजता कोलम येथे पोहोचलो.

 

निघण्यापूर्वी चार दिवस आधी चेन्नईला

स्वेटर घालावे लागण्याइतपत थंडी होती. सूर्यदर्शन नव्हतंच, वातावरणही ढगाळ पण छान वाटत होतं. इथे पोहोचल्यानंतर मात्र त्रासिक वाटणाऱ्या लख्ख उन्हाने स्वागत केलं…

 

दोन टॅक्सी करून रिसॉर्टवर आलो. चेक -इन टाईम एक वाजेचा होता. तोपर्यंत रिसेप्शन हॉलमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या पर्यटकांना न्याहाळत निवांत बसलो, रिसॉर्टचा परिसर पाहिला. विस्तीर्ण अष्टमुडी तलावाच्या काठावर वसवलेलं क्लब महिंद्राचं रिसॉर्ट…चढउतारानुसार योजलेल्या विविध आकार-प्रकारच्या रूम्स…रूम मध्ये सोडण्यासाठी नागमोडी वळणाच्या अरुंद रस्त्यांवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक बग्ग्या…बरीचशी झाडं भुईसपाट करून आणि काही झाडं वाचवून हिरवाई जपल्यासारखं भासवणारं, कमी जास्त प्रमाणात इतर अनेक रिसॉर्टसारखंच असलेलं हे रिसॉर्ट…असो…

 

काय गंमत असते पहा…निसर्गावर अतिक्रमण करून, त्याला कोसो मागे हटवून विकासाच्या गोंडस नावाखाली आधी सिमेंटच्या जंगलात पंचतारांकित पण धकाधकीचं आयुष्य जगण्याचा हव्यास धरायचा आणि कधी शांतता हवी म्हणून, तर कधी बदल हवा म्हणून

दीर्घ सुट्ट्यांची पर्वणी साधुन गाडीने, रेल्वेने, विमानाने हजारो किलोमीटरचा प्रवास करत अशा निसर्गरम्य परिसरात यायचं तर खरं पण तेथेही हजारो रुपये खर्चून रहाण्यापासुन ते जिभेचे चोचले पुरवण्यापर्यंतची पंचतारांकित अपेक्षा धरायची…तर तेही असोच…अर्थात कधीकधी आम्हीही त्याचाच एक भाग असतो म्हणा…पण आपल्याकडून पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचावी असा प्रयत्न करतो…’कालाय तस्मै नमः …’

 

एक वाजता रूम मिळाल्यावर जेवण करून आराम केला. संध्याकाळी थोडावेळ पावसाने हजेरी लावली. आणि आम्ही रात्रीच्या मुद्दाम लावलेल्या मंद दिव्यांच्या अंधुक प्रकाशात रिसॉर्टच्या परिसरात वेळ घालवला. पौष कृष्ण दशमीची अंधारलेली रात्र…प्रदूषण विरहित निरभ्र आकाश आणि कितीतरी दिवसानंतर दिसलेल्या ठळक चांदण्या…इतक्या ठळक की त्या चांदण्या आहेत यावर विश्वासच बसत नव्हता.

 

१४-१-२६.

 

पहाटे नेहमीप्रमाणेच जाग आली. अगदी कमी झोप होऊनही फ्रेश वाटत होतं. एवढी प्रशस्त रूम आणि मी एकटीच…कोणी डिस्टर्ब होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे सवयीने उठून स्नानादी आन्हिकं उरकली आणि बाल्कनीचा पडदा उघडताच उगवत्या सूर्यनारायणाचं दर्शन घडलं. आज मकर संक्रांत…सूर्याचं महत्त्व अधोरेखित करणारा हा महत्त्वाचा, अध्यात्मिक पण आरोग्याची बैठक असलेल्या इतर अनेक सणांप्रमाणे एक सण…मनोभावे सूर्याला वंदन केलं आणि निघाले मॉर्निंग वॉकला…अथांग पसरलेल्या मग्न तळ्याकाठी सूर्यस्नानाचाही लाभ झाला. एकावर एक फ्री…

 

रिसॉर्ट पासून काही अंतरावर असलेल्या munraw नावाचं बेटावर mangrhv चं जंगल आहे. पण आता तेथेही काही गेम्स, सेल्फी पाँइंट, रहायला रूम्स असे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभनं निर्माण करण्यात येतच आहेत. त्यामुळे भविष्यात ‘आहे’ ऐवजी ‘होतं’ असं क्रियापद वापरावं लागेल अशी साधार भिती वाटते.

 

तर ब्रेकफास्ट उरकून बच्चेकंपनी त्यांच्या बाबांबरोबर तेथेच स्पीडबोटीची आणि कयाकिंगची मजा घ्यायला गेली.

आणि आम्ही इकडेच टाइमपास करत बसलो.

 

साधारण १२-३० वाजता चेक-आउट केलं. दोन टॅक्सी ठरवल्या होत्या. रिसॉर्ट पासून साधारण १-३० तासांच्या अंतरावर ‘जटायू शिल्प’ मंदिर आहे.

हे शिल्प तिरूअनंतपुरम आणि कोलम या दोन्ही शहरांपासुन जवळपास सारख्या अंतरावर साधारण एक तासाच्या अंतरावर आहे. असं म्हणतात की जटायू-रावण यूध्द इथेच झालं आणि पंख कापलेल्या जखमी अवस्थेत जटायू सीतेचा पत्ता देण्यासाठी रामाची वाट पहात तेथेच थांबला. तोपर्यंत त्याचे प्राणोत्क्रमण होऊ नये म्हणून सीतेने त्याच्यासाठी एक लहानसं तळं निर्माण केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत ते तळं कधीही आटलं नाही. आज पर्यंत अनेक देव-देवता, पुढारी इत्यादींचे लहान मोठ्या आकारांचे अनेक पुतळे पाहिले होते. पण एका सर्वस्वी अनोळखी? अशा स्त्रीच्या रक्षणासाठी आत्मबलिदान करणाऱ्या पक्ष्याच्या कृतज्ञतापूर्वक स्मृतीप्रित्यर्थ एवढे भव्य सार्थ स्मारक उभारणारी ही पहिलीच कलाकृती असावी.

 

थोडीशी गर्दी होती…पण प्रत्येकी रोपवेसह साडेपाचशे रुपये आणि पायऱ्या चढून जाण्यासाठी सव्वा तीनशे रुपये अशी तिकीटं देण्यापासून ते रोपवेच्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित यंत्रणा कार्यरत होती. प्लॅस्टिक आणि अन्नपदार्थ नेण्याला मनाई होती. रोपवेसाठी तीन केबिन्स होत्या. एका केबिनमध्ये आठ सीट्स आणि आम्हीही आठच जण…त्यामुळे आजूबाजूचा परिसर बघताना अर्थातच एकत्रित फोटोसेशनचीही हौस भागली.

फक्त चार मिनिटात आम्ही जटायू शिल्पाजवळ पोहोचलो. आणि ते भव्य शिल्प पाहून एकच उद्गार निघाला ‘व्वा!’

विस्तीर्ण अशा कातळावर पांढऱ्या गुलाबीसर रंगांच्या दगडातून अथक परिश्रमांनी हे शिल्प साकारले आहे. त्या मागची कथा माहिती असल्यामुळे साहजिकच ते वंदनीय ठरते. शिल्पाच्या तळाशी ते साकारणाऱ्या प्रयत्नांची आणि ते प्रयत्न करणाऱ्या कारागिरांची माहिती कोरण्याबरोबरच ‘शिल्पावर चढू नये’ अशीही सूचना कोरली आहे. पण आपल्याला कुठल्याही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित स्थळ सौंदर्याचा आस्वाद घेण्यापेक्षा त्याचे किंबहुना त्याच्याबरोबर आपलेही वेगवेगळे अँगलने अगणित फोटो काढून ते सोशल मीडियावर पाठवण्यातच जास्त रस असतो. त्यात फारसं गैर आहे असं नाही पण… त्यालाही काही मर्यादा असाव्यात आणि त्या परिसराचं सौंदर्य अबाधित ठेवण्याचं भान असावं…असं मला वाटतं. अर्थातच इथेही तोच प्रकार सुरू होता. त्यामुळेच शिल्पाच्या चारही बाजूला ‘शिल्पावर चढू नका’ अशी सूचना करणारे सिक्युरिटी गार्ड उभे होते. खरंतर ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. पण लक्षात कोण घेतो! असो.

 

आता रात्री आठ वाजताची परतीची रेल्वे गाठायची होती. येथून कोलम स्टेशन एक तासाच्या अंतरावर होतं. अर्थात त्यापूर्वी संध्याकाळची पोटपूजाही आटपायची होती. ती स्टेशनलगतच्याच उडुपी हॉटेलमध्ये उरकली आणि एक तास अगोदर निवांत गाडीची वाट पाहत स्टेशनवर बसलो.

 

गाडी आली, गाडी निघाली…उडूपीमधलं जेवण फक्त ‘उरकल्यामुळे’ काहीजणांनी गाडीत मिळालेल्या भोजनाचाही आस्वाद घेतला आणि सर्वजण निद्राधीन झालो.

 

१५ जानेवारी २६…

 

रात्रभराच्या निर्विघ्न प्रवासानंतर सकाळ झाली, सूर्य उगवला…आज साडेदहा वाजता उतरायचं होतं त्यामुळे निवांत…निवांत…ज्यांना हवा होता त्यांना ब्रेकफास्टही गाडीतलाच…लेकाच्या-हेमंतच्या वाढदिवसाचे सेलेब्रेशनही गाडीतच…

आणि चेन्नई-सेंट्रल वर उतरलो. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि अश्या ‘शॉर्ट बट स्वीट’ सहलीची सांगता करताना पुढच्या सहलीचेही सुतोवाच करत आपापल्या घरी आलो आणि पुन्हा दैनंदिन दिनक्रम सुरू केला.

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

Bharati.raibagkar@gmail.com

9763204334

प्रतिक्रिया व्यक्त करा