*महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्याच मार्गाने चालणे हेच खरे पूजन! – सिद्धनाथ घायवट जोशी*
पिंपरी
‘महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्याच मार्गाने चालणे हेच खरे त्यांचे पूजन होय!’ असे प्रतिपादन राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कारप्राप्त वक्ते आणि विचारवंत सिद्धनाथ घायवट जोशी यांनी काळेवाडी, पिंपरी येथे सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी केले. स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद विचारमंच द्वारा आयोजित विशेष कार्यक्रमात सिद्धनाथ घायवट जोशी बोलत होते. युवा उद्योजक राजेश अगरवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सिद्धनाथ घायवट जोशी पुढे म्हणाले की, ‘आपल्या देशात थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. प्रतिमापूजन, पुष्पहारअर्पण, मिरवणुका, जलसे, घोषणाबाजी यांमधून श्रद्धा व्यक्त केली जाते; मात्र या सर्व बाह्य साजरीकरणापेक्षा महापुरुषांचे विचार, मूल्यव्यवस्था आणि जीवनदृष्टी आपल्या आचरणात उतरवणे अधिक महत्त्वाचे आहे. महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्याच मार्गाने सातत्याने वाटचाल करणे हेच त्यांच्या पूजनाचे खरे आणि शाश्वत स्वरूप आहे. राजमाता जिजाऊंनी बाल शिवबाला घडविताना केवळ शस्त्रविद्या शिकवली नाही, तर रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांच्या कथांमधून धर्म, नीती, कर्तव्य आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजवले. याच संस्कारांतून स्वराज्याचा विचार जन्माला आला आणि पुढे तो इतिहास घडवणारा ठरला. संस्कारांची ही परंपरा टिकली असती तर आजचा समाज अधिक सक्षम व सुसंस्कृत झाला असता. आजच्या तरुण पिढीने केवळ उत्सवप्रियतेत न अडकता विचारप्रधान जीवनशैली अंगीकारण्याची आवश्यकता आहे!’ असे आवाहन त्यांनी आपल्या स्पष्ट, परखड आणि ओघवत्या वक्तृत्वशैलीतून उपस्थितांना करताना विविध महापुरुषांच्या चरित्रातील वेगवेगळे संदर्भ उद्धृत केले. अतिशय खेळीमेळीच्या, संवादात्मक आणि सहज भाषाशैलीत सादर झालेल्या या व्याख्यानाला उपस्थित श्रोत्यांनी वारंवार टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप जाधव, मयूर पाटील, रविकिरण देशमुख, संदीप पाटील, दीपक पांडे, श्रीराम भालेकर आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास थेरगाव, वाकड, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा परिसरातील आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अशा विचारप्रवर्तक कार्यक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याची भावना व्यक्त केली.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
