आदर्श शेतकरी पुरस्कार 2025 जाहीर; राज्यातील 13 प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान
वैभववाडीचे महेश रामदास संसारे ‘आदर्श शेतकरी पुरस्कार 2025’ चे मानकरी
वेंगुर्ले
सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था, वेंगुर्ला आणि कृषी तंत्र निकेतन, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील प्रगत, नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी ‘आदर्श शेतकरी पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील 13 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांमध्ये डॉ. उत्तम सूर्यकांत फोंडेकर (मालवण, सिंधुदुर्ग), ऋषिकेश बाळासाहेब काळे (करमाळा, सोलापूर), विशाल विजय ठाकूर (वेंगुर्ला), महेश दिनकर सावंत (देवगड), गजानन विष्णू परब (कुडाळ), विवेक शांताराम चव्हाण (शिरगाव), चंद्रकांत लक्ष्मण पवार (मसळा, रायगड), विजय हनुमंत मोरे (तासगाव, सांगली), पांडुरंग कुंडलिक बरळ (इंदापूर, पुणे), महेश रामदास संसारे (वैभववाडी, सिंधुदुर्ग), डॉ. संभाजी अर्जुन भोसले (बारामती, पुणे), चेमा रावजी गावित (नवापूर, नंदुरबार) आणि अरुण बळीराम मगर (पुणे) यांचा समावेश आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष नारायण गोपाळ सावंत, कार्याध्यक्ष गुणाजी धोंडी धुरी, संस्थेचे डायरेक्टर प्रा. विनायक ठाकूर, संचालक कोमल ठाकूर व विजय रामचंद्र ठाकूर, तसेच सदस्य किशोर हुळगेकर, विश्राम सावंत आणि नितेश कलगूटकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शन करताना वक्त्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रयोगशीलता आणि उद्योजकतेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागांतून शेतकरी, विद्यार्थी व कृषीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
