मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मराठी संस्कृतीचा अभिमान मानल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या मोडी लिपीच्या संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी “श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल” आणि “शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोडी लिपी – मोफत शिकवणी वर्गाचा १८ जानेवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. मोडी लिपीचा प्रसार व्हावा आणि तिचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे प्रशिक्षण शिबिर एकूण १० रविवार चालणार असून दर रविवारी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वर्ग घेतले जाणार आहेत. शिबिराच्या पहिल्याच दिवशी विविध वयोगटांतील मोडी लिपीप्रेमी, इतिहास अभ्यासक तसेच नवशिक्या प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे वर्ग डॉक्टर गायकवाड‘स इन्स्टिट्यूट, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहेत.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये मोडी लिपीची मूलभूत ओळख, अक्षररचना व लेखनपद्धती, प्राथमिक वाचन–लेखन प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासोबतच वैयक्तिक मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. या वर्गांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन वनिता साळुंखे या करत असून त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे प्रशिक्षण अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि प्रभावी ठरत आहे.
या प्रशिक्षण शिबिराच्या प्रारंभप्रसंगी प्रवीण जाधव (शिव स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान संस्था अध्यक्ष) आणि रुपेश पवार (मोडी लिपी आणि इतिहास अभ्यासक) यांची उपस्थिती लाभली. मोडी लिपी शिकणे म्हणजे आपल्या वैभवशाली इतिहासातील बखरी, राजपत्रे, दस्तऐवज व शिलालेखांशी थेट नाते जोडण्याची दुर्मिळ आणि अमूल्य संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. मोडी लिपीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
