You are currently viewing शिक्षण, सेवा आणि संस्कारांचा त्रिवेणी संगम : कै. आप्पा गोवंडे यांचा प्रेरणादायी वारसा

शिक्षण, सेवा आणि संस्कारांचा त्रिवेणी संगम : कै. आप्पा गोवंडे यांचा प्रेरणादायी वारसा

शिक्षण, सेवा आणि संस्कारांचा त्रिवेणी संगम : कै. आप्पा गोवंडे यांचा प्रेरणादायी वारसा

फ्लाईंग बर्ड्स स्कूल, पुणेचे संस्थापक श्री. जयंत सुधा जयराम परांजपे यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक संकुलाची होणार उभारणी

कै. भास्कर उर्फ आप्पा बंडोपंत गोवंडे हे मुळचे देवराष्ट्रे (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरकारी सेवेमुळे त्यांनी कोकणात आपले कार्यक्षेत्र निर्माण केले. तलासरी (पालघर) येथून सेवेला सुरुवात करून पनवेल व इतर ठिकाणी कार्यरत राहिल्यानंतर ते कणकवली, सिंधुदुर्ग येथे आले. पुढे सावंतवाडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि ते सावंतवाडीचे तसेच कोकणाचे कायमस्वरूपी नागरिक झाले.
आपल्या सेवाकाळात सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्यात कै. आप्पा गोवंडे यांचे मोलाचे योगदान राहिले. लोककल्याणाची भावना आणि प्रामाणिक प्रशासन हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.

त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती नर्मदा गोवंडे यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी भटवाडी, सावंतवाडी येथील वेदपाठ शाळेमध्ये बालवाडी तसेच टीचर ट्रेनिंग कोर्स सुरू केला. या शैक्षणिक कार्यात कै. आप्पा गोवंडे यांनी त्यांना नेहमीच भक्कम पाठबळ दिले.
देवराष्ट्रे येथील वडिलोपार्जित शेतजमिनीला योग्य तो न्याय मिळावा आणि ती समाजोपयोगी कार्यासाठी वापरली जावी, या उदात्त हेतूने कै. आप्पा गोवंडे यांनी पत्नी, मुलगा व दोन्ही मुली यांच्या संमतीने ही जमीन मुलगी सौ. सुजाता परांजपे व जावई श्री. जयंत परांजपे यांच्या शैक्षणिक संस्थेला विना मोबदला दान दिली. या जमिनीवर शालेय संकुल उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या दानामागे एक भावनिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कै. आप्पा गोवंडे यांचे वडील दिवंगत बंडू नीलकंठ गोवंडे हे शिक्षक होते. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी एक म्हणजे महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतरावजी चव्हाण. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे पहिले गुरु दिवंगत बंडू मास्तर गोवंडे यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याचा संकल्प फ्लाईंग बर्ड्स स्कूल, पुणेचे संस्थापक श्री. जयंत सुधा जयराम परांजपे व सौ. सुजाता जयंत परांजपे यांनी केला आहे.
“मरावे परी कीर्ती रूपे उरावे” या उक्तीप्रमाणे कै. भास्कर उर्फ आप्पा गोवंडंत गोवंडे यांनी आपल्या सेवाभाव, शिक्षणप्रेम आणि दानशूर वृत्तीने समाजासमोर एक आदर्श ठेवला असून त्यांचा हा वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा