सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीतूनच
शंभर टक्के विजयाचा विश्वास – खा. नारायण राणे
कणकवली
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी–सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी दिली.
कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला पदाधिकारी व महायुतीचे इतर नेते उपस्थित होते.
खा. नारायण राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुतीची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीच्या माध्यमातून विरोधकांचा धुव्वा उडवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून शिक्षण, आरोग्य क्षेत्रात भरीव काम झाले आहे. चिपी विमानतळाची विमानसेवा पूर्णपणे सुरू झाली असून आरोग्य सेवा सुरळीतपणे कार्यरत आहेत. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले असून या विकासात विरोधकांचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळे मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप व शिवसेनेलाच आहे, असा ठाम दावा त्यांनी केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आज किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ शनिवारी सायंकाळपासून होणार आहे. महायुती शंभर टक्के विजय मिळवेल, असा विश्वासही खा. राणे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले की, महायुतीची निवडणूकविषयक बैठक पार पडली असून जागावाटपाचा अंतिम निर्णय जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. ही निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
