पाईपलाईन कामानंतरही रस्ता अपूर्ण…
रस्ता दुरुस्ती रखडल्याने देव्या सूर्याजी आक्रमक
सावंतवाडी
शहराच्या मुख्य बाजारपेठेत पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन दहा दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला, तरी अद्याप रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. या दिरंगाईमुळे संतप्त झालेले नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागावर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका घेतली आहे. आजच रस्त्याचे काम सुरू न झाल्यास रस्त्यावरची माती व खडी थेट नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारात नेऊन टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बाजारपेठेतील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नव्या पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले होते. रस्ता खोदताना तात्काळ दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण होऊनही रस्ता जशास तसा ठेवण्यात आल्याने सध्या संपूर्ण परिसरात धुळीचे लोट पसरले आहेत.
या परिस्थितीमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ कागदी प्रक्रिया आणि टेंडरमध्ये अडकले असून सामान्य जनतेच्या अडचणींकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवक सुर्याजी यांनी केला आहे.
दरम्यान, व्यापाऱ्यांनीही धुळीमुळे दुकानातील माल खराब होत असल्याची तक्रार केली आहे. भविष्यात या खराब रस्त्यामुळे अपघात झाला किंवा आर्थिक नुकसान वाढले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाचीच राहील, असा इशाराही नगरसेवक सुर्याजी यांनी दिला आहे.
