सिंधुदुर्गात कृषी व्यवसायांना चालना देण्यासाठी ‘एग्रीकल्चर बिझनेस फोरम’चा उपक्रम
रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी कणकवली येथे महत्त्वपूर्ण बैठक
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक कृषी उद्योगांना नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा एग्रीकल्चर बिझनेस फोरमच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. बीच पर्यटन, कृषी पर्यटन, फळबागायत व कृषी उत्पादने, मत्स्य व्यवसाय तसेच फळ प्रक्रिया उद्योग हे कोकणातील पारंपारिक आणि शाश्वत कृषी उद्योग असून, या क्षेत्रांत कमी गुंतवणूक, शासनाच्या विविध सबसिडी योजना आणि प्रामाणिक कष्ट यांच्या जोरावर नुकसान होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा १०० निवडक व्यवसायिकांची निवड करून त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर कोकणातील तरुण कृषी व्यवसायाकडे वळतील आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता तेली आळी, कणकवली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सहभागी व्यवसायिकांनी आपल्या अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करावे, तसेच विषयासंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन बाळासाहेब सावंत, कणकवली यांनी केले आहे.
