You are currently viewing मकर संक्रांत वैज्ञानिक दृष्टीक्षेपातील सण असूनही महिलांची कुचंबना कशासाठी ?

मकर संक्रांत वैज्ञानिक दृष्टीक्षेपातील सण असूनही महिलांची कुचंबना कशासाठी ?

*काव्यप्रेमी साहित्य समूहाचे सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*

 

*मकर संक्रांत वैज्ञानिक दृष्टीक्षेपातील सण असूनही महिलांची कुचंबना कशासाठी?*

 

( विज्ञानाच्या अनेक कसोट्यांवर पारखून सत्य शोधून अज्ञानपणाच्या मस्तकावर सत्याच्या आसुडाचे घाव घालणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री ज्योतिबा फुले यांना त्रिवार वंदन.)

 

मित्रांनो,

भारतीय संस्कृती खूप चांगली आहे,असं म्हणून आपण आपल्यातले अज्ञानपण, अवैज्ञानिकता,अधार्मिकता लपवितो हे खरे पातक आहे असे मी समजतो.

या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक रूढी व परंपरा ह्या अवैज्ञानिक, अधार्मिक आहेत याचाही परामर्श वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणाऱ्या, पुरोगामीत्वाचा विचार करणाऱ्यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे. तसे न होता चालत आलेल्या रुढी परंपरेला गुलामी सारखं स्वीकारतो असेच दिसते..

प्रत्येक रीती -रिवाज,परंपरा धार्मिकता,अधर्मिकता याचं चिंतन करायला हवं.विचार करायला हवा.त्यातला चांगुलपणा शोधून स्वीकार करायला हवा.असं होताना दिसत नाही. ते दिसावं आपल्यात डोळसपणा यावा,म्हणून महात्मा फुले यांनी आपल्या जीवनाचं समर्पण केलं.त्यांचं नाव घेऊन आपण भाषण करत असतो,परंतु आपल्या विचारात व आचरनात बदल दिसतो.आपण तसं कधीच वागत नाही.त्याचं दुःख मात्र तुम्हाला सांगावसं वाटतय.

या देशामध्ये असे अनेक सण-उत्सव आपण पाहत असतो. अनुभवतो आणि साजराही करून जातो.साधा विचारही करत नाही की या सण उत्सवाचा कुटुंबातल्या, समाजातल्या इतर लोकांच्यावरती, विशेषतः विधवा महिलांच्या वरती काय परिणाम होत असेल? त्याच्या मनाला वेदना होत असतील काय? त्याचं निरीक्षण आपण कधी करतो का?त्याचा विचार आपण कधी करतो का?त्याचं दुःख वाटून घेता नाही आलं नाही तरी त्यांना सामावून घेऊ शकू का? अशा दृष्टीकोनातून विचार जरी करायला लागलो तरी ज्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सज्ञानाचा तिसरा डोळा आपणास बहाल केला. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली असे होईल.

मित्रांनो आज आपण मकर संक्रात या सणाचा परामर्श घेणार आहोत. हा सण वैज्ञानिक आहे. म्हणून त्याचे स्वागत करणार आहोत.त्यासोबत स्त्रियांच्यामध्ये भेदभाव निर्माण करणारा सण आहे, यास दुजोरा देऊन चालणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केला तर हा सण साजरा करावाच लागेल. यातील नेमकी वैज्ञानिकता काय आहे ते आपण पाहू.

21 डिसेंबर हा दिवस दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा तर राञ लहान आसते.या उलट स्थिती उत्तरगोलार्धात आसते.या तारखेनंतर उत्तर गोलार्धात दिवस मोठा होत जातो तर राञ लहान होत जाते.14 जानेवारी रोजी सुर्य धनुराशीतुन मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून मकरसंक्रात साजरी केली जाते. नवधान्य हरभरा, वटाना, गहु(ओंब्या) ,बोरे ,ऊस यांनी सौभाग्यवती एकमेकींची ओटी भरतात ,सौभाग्यवती चुडे भरतात, तीळगुळ देऊन तोंड गोड करतात. जीवनातील अंधार कमी होऊन सुख येवो अशा शुभेच्छा देतात.सुर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात कना-कनाने, तिळातिळाने वाढत जातो. मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे भ्रमण करण्याची प्रक्रिया सुरू होते.यावेळी आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात थंडी असल्यामुळे तिळगुळा सारखे उष्ण पदार्थ खावेत.ते इतरांना द्यावेत.थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची त्वचा कोरडी पडते. तेव्हा उष्ण आणि तेलगट पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीराला लागणाऱ्या गरजा भागविला जातात.हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोनातला आणि ऋतू बद्दलत जाणारा काळ,असेही आपण संबोधले तरी चालेल.आणि तें सत्य आहे.म्हणून अशावेळी एकमेकांना उष्ण आणि गोड पदार्थ देऊन आनंद उत्सव साजरा केला जातो. आर्थिक दृष्ट्या कमकुवत,शारीरिक दृष्ट्या गरजू आणि विकलांग लोकांना ज्यांच्याकडे नाही अशांनाही मदत केली जाते.आणि केली जावी.मित्र-मैत्रिणींना गोडधोड खाऊ घालून भेटीगाठी घेऊन तिळगुळ दिले जातात.त्यास वाण लुटणे हाही शब्दप्रयोग या दिवशी केला जातो.

इतका चांगला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा हा सण

असा हा सुखद आनंद देणारा,आनंद द्विगुणीत करणारा सर्वांसाठी उपयोगी असणारा सण,

मला प्रश्न पडतो मग या सणांमध्ये विधवांना का नाकारलं गेलं? का त्यांना बहिष्कृत केले गेलं?त्यांच्या दुःखावर का फुंकर मारली जाते? मग वाटते की मनुवादी आणि पुरुषी अहंकाराचा प्रकोप तर या महिलांच्या वरती झालेला नसावा. ते पाहणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्रात तर या सणा दिवशी घरा घरात गोडधोड जेवण केलं जातं. तिळा गुळाचे अनेक पदार्थ तयार केले जातात.देवाला नैवेद्य दाखविला जातो.अशावेळी सर्व महिला एकत्र येतात.हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतो.विशेषता विठ्ठल रुक्मिणी मंदिर किंवा देवीच्या मंदिरात जास्तीत जास्त महिला जात असतात.एकमेकांना हळदीकुंकू लावतात.भेटीगाठी होतात.तिळा गुळापासून तयार केलेले अनेक पदार्थ एकमेकीना मोठ्या आदराने दिले जातात.आदर सत्कार केला जातो.गोड धोडाचे नवे वाण लुटले जातात…

आता मला सांगा एवढा आनंदाचा निसर्गाच्या संक्रमणाचा सण असताना विधवांना का नाकारलं?का त्या देवाला भेटू शकत नाहीत? ते हळदीकुंकू लावू शकत नाहीत का ? त्या वाण,खण,नारळ,गोड पदार्थ देऊ शकत नाहीत का? त्या देवाला नारळ पडू शकत नाहीत का?

आमची संस्कृती सांगते की, देवाला नारळ फोडल्यानंतर पुन्य मिळतं, मग आम्ही महिलांना का बहिष्कृत करतो? सगळेच प्रश्न आमच्या अंगवळणी पडून गेलेत का?याचा विचार का करत नाही? याचा अभ्यास का करत नाही?आम्ही स्वतःला शिक्षक,प्राध्यापक, इंजिनियर,डॉक्टर, समाजसेवक म्हणून संबोधून घेत असताना. याची वेदना,याची तीव्रता,आपल्या मनापर्यंत का पोहोचत नाही.मग मनाला प्रश्न पडतो,आमच्या मनाला/विवेकबुध्दिला गंज तर चढलेला नसेल??? आणि जर आम्ही सुज्ञ असु,विचारवंत असु,तर मग मनाला चढलेला गंज कधी घासून काढणार आहोत.???आणि मग असे नसू तर सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यानी आपली गंजाळलेली बुद्धी गहाण ठेवायची का?

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी विधवा आहे. विचारा तिला.तिला बोलतं करा.समजून घ्या तिच्या भावना.ती काय सांगते ऐका.ती जेव्हा बोलायला लागेलना!!! तेव्हा ऐकताना तुमच्या मनामध्ये हलकल्लोळ माजेल.तेव्हा आपण निरुत्तर होऊन जाऊ. शिव,शाहू,फुले,आंबेडकरांचे नाव घेण्यापुरते आम्ही शिल्लक आहोत का?असेच म्हणावे लागेल ना!!!!

एकीसाव्या शतकाकडे जात असताना आपण समाज बदलाचं स्वप्न पाहू शकलो नाही,समाज बदलऊ शकलो नाही,समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पेरू शकलो नाही, तर येणारा काळ आम्हाला कसा माफ करेल??? हा प्रश्न आज तरी अधांतरीच आहे…….

 

*सत्यशोधक*

*भूमिपुत्र वाघ* 9172972482

प्रतिक्रिया व्यक्त करा