You are currently viewing जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक

 राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली नोडल ऑफिसरची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक नियोजन, प्रशासनाची तयारी, जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी नीट समजून घेऊन दक्षतेने काम करावे. आचारसंहिता अंमलबजावणी, मतदान केंद्रांची तयारी, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, तसेच मतदारांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी सतत सजग राहावे, तसेच आयोगाच्या सूचनांनुसार वेळोवेळी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम केल्यास निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, बालाजी शेवाळे, श्रीमती आरती देसाई, विविध नोडल अधिकारी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा