मोती तलावाच्या फूटपाथवरील कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त
नगरसेविका सायली दुभाषींची प्रशासनाकडे मोठ्या कचराकुंड्यांची तातडीची मागणी
सावंतवाडी
सावंतवाडी येथील मोती तलाव परिसरात नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छोट्या कचराकुंड्यांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कचराकुंड्या आकाराने लहान असल्याने त्यातील कचरा फूटपाथ व रस्त्यावर पसरत असून त्यामुळे सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रकाराबाबत नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. मोती तलाव परिसरात हॉटेल व्यवसाय तसेच आईस्क्रीम पार्लरसारखे व्यवसाय वाढत असून येथे येणाऱ्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. मात्र उपलब्ध असलेल्या छोट्या कचराकुंड्या अपुऱ्या ठरत असून मोकाट कुत्रे व जनावरे त्यातील कचरा बाहेर काढत असल्याने परिसर अधिकच अस्वच्छ होत आहे.
याचा फटका विशेषतः ज्येष्ठ नागरिक व सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना बसत असून, संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण होत आहे. एकीकडे स्वच्छतेबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले जात असताना अशा प्रकारच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेविका दुभाषी यांनी केला आहे.
छोट्या कचराकुंड्यांच्या जागी मोठ्या आणि सुरक्षित कचराकुंड्या बसवण्यात आल्यास मोकाट जनावरे कचरा बाहेर काढू शकणार नाहीत व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या मागणीसाठी आपण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असून, स्वच्छ व सुंदर सावंतवाडीसाठी आपला नेहमीच पुढाकार राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

