सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे ॲड. अनिल निरवडेकर विजयी
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी शिवसेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांचा पराभव करत विजय मिळवला. ॲड. निरवडेकर यांना १२ मते मिळाली, तर अजय गोंदावळे यांना ७ मते मिळाली. काँग्रेसचे तौकीर शेख व उबाठाचे देवेंद्र टेमकर यांनी या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.
आज सकाळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले यांच्या उपस्थितीत ॲड. अनिल निरवडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याच पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांनीही अर्ज सादर केला होता. दुपारी छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध ठरल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली.
मतदानात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी ॲड. अनिल निरवडेकर यांच्या बाजूने मतदान केले. निकाल जाहीर होताच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी ॲड. निरवडेकर यांचा विजय घोषित केला. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.
याचवेळी स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे ॲड. सिद्धार्थ भांबुरे व शिवसेनेच्या वतीने ॲड. नीता कविटकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षा यांनी केली. निकालानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, विनोद राऊळ यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व स्वीकृत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांचे अभिनंदन केले.
विजयानंतर ॲड. अनिल निरवडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. तसेच युवा पदाधिकारी विनोद राऊळ यांचे विशेष आभार व्यक्त केले. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार असून विकासाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
