*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
भाग: ४८
*हळद कुकुम*
नेहमी सकाळी येणारा काकल्या आज संध्याकाळचा घरी आलेला. मी त्याबद्दल त्याला विचारणार होतो, तेवढ्यात त्यानेच प्रश्न केला.
“उद्या सक्रात मां?तुमच्याकडे वैनीचा हळद कुकुम केवा?”
मी म्हणालो ,”बघूया.” बघूया हा शब्द तसा बर्यापैकी उपयुक्त शब्द आहे.
“बघूया? खेच्यात बगतंस? पंचागात तर उद्याच संक्रात लिवलाहा. ”
“तसं नव्हे रे. तिची सोय पाहून करायला हवं ना?” मी समजावत म्हणालो. आमच्या इथे ‘मकर संक्रांत ते रथसप्तमी’ या कालावधीत वाड्यातल्या बायकांना बोलावून घरोघरी हळदी कुंकू उत्सव साजरा करतात. यातही ‘मकर संक्रांत’ इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे, तर ‘रथसप्तमी’ मराठी कॅलेंडर प्रमाणे हेही एक आगळं वैशिष्ट्य आहेच.
“पून आताच्या दिसात ह्या हळद कुकवाची गराज हा काय?” काकल्याने तोंड उघडले.
“आहेच ना. अरे ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. ती जपणे सर्वकाळ आवश्यक आहे.” मी ठामपणे म्हणालो.
“बऽरा. ह्या दिसा कसली कसली संस्कृती जपाची, ता तरी सांग. माथ्यार हळद कुकुम होया ह्या बरोबर, पून आता लायतत कोनकोन ता सांग. जगाचा नको रे, गावापूरताच सांग. सगळीच टिकले टेकयतत. ते वायट नसतीतय, पून हळद कुकुम येका दिसा पूरता करून तुमी काय हाशील करतांस? बरा, माथ्यावरच्ये केस घटत चल्लेत, आनी अस्टरची फूला वाटताहात. ही संस्कृती काय?” काकल्या प्रश्नामागून प्रश्न टाकत राहिला.
“मग काय हे सगळं बंद करायचं?”मी उद्वेगाने म्हणालो.
“असाच काय नाय. पून काळानुसार सणाच्या रचनेत, नायतर सणात बदल करणा गरजेचो हा. पुर्वी आमी मातयेच्या भांड्यातच रांधू. आता सुगडा कित्याक वाटतांस? बचतगटामुळे हाली बायला घराभायर पडततच, त्येच्यासाठी हळद कुकुमाची गराज नाय. माका वाटता, घराघरात हळद कुकुम करून प्ल्याश्टीक वाटूच्यापेक्षा गावात एकच कार्यक्रम करायचो. आनी ‘वाणां’ वाटूची तर सातबारे वाटा. तो वाचूचो कसो हेची बायकांका म्हायेती दिया. अरे, आपले जम्नी आपल्या नावार हत काय नाय ता तरी त्येंका कळात. सूर्याचा संक्रमण बाजूक ठेय. दिल्लीवाले संक्रमण करून कोकणात इलेहत, ह्या धेनात घेया.” काकल्या बोलत राहिला, कळीचा मुद्दा घासत राहीला.
काकल्याचं बडबडून झालेलं, त्यामुळे तो जायला निघाला. निघताना डोळे मिचकावत म्हणाला, “फाल्या येतय, पून ते साखरदाणे नको हां. खरे तीळ आनी गूळ दी. संस्कृती जपाक होयी बाबा.”
काकल्या येत रहातो, प्रत्येकवेळी वेगळं काहीतरी मांडत रहातो; पण भेटीत असं काही सांगून जातो, की जाताना तो काळाला मागे रेटीत जातो, असा भास होत रहातो.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
