You are currently viewing प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…….

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…….

सिंधुदुर्गनगरी

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये केंद्राचा वाटा 60 टक्के आणि राज्यांचा वाटा 40 टक्के असणार आहे. या योजनेसाठी एकूण 10 हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

            या अंतर्गत अस्तित्वात असलेल्या सुक्ष्म उद्योगांचे अधुनिकीकरण करून त्यांना संघटीत क्षेत्रामध्ये रुपांतरीत करणे, शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट, सहकारी संस्था यांना सार्वजनिक पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन, फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज, ब्रॅंडिग व बाजारपेठ सुविधा याकरिता योजनेअंतर्गत पॅकेल उपलब्ध करून देणे हे उद्देश आहेत. जिल्ह्यातील कृषी अन्न प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सामाईक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी क्रेडिट लिंग द्वारे बँक कर्जाशी संबंधित अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

            या योजनेमध्ये एक जिल्हा एक उत्पादन हे धोरण स्वीकारण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून यामध्ये आंबा पिकाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मुल्य साखळी विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मदत होणार आहे.

            तसेच पायाभूत सुविधा, मुल्यवर्धन, फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज, भाग भांडवल गुंतवणूक याकरिता प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के निधी, कमला अनुदान 10 लाख रुपयांच्या मर्यादेत आणि ब्रॅडिंग व बाजारपेठ सुविधेसाठी प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान निधी क्रेडिट लिंकड कॅपिटल सबसीडी या आधारावर अनुज्ञेय असणार आहे. लाभार्थी हिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के रक्कम देणे आवश्यक आहे. अनुसुचित जाती, जमाती व महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार आहे. प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी विहित मापदंडानुसार होणारा संपूर्ण खर्च 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना खेळते भांडवल व छोटी अवजारे खरेदीसाठी अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित कमाल दहा सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणूक, भांडवल म्हणून फेडरेशन मार्फत कमाल 40 हजार रुपये प्रती सदस्य अनुज्ञेय आहे.

            या योजनेसाठीचा प्रस्ताव एक जिल्हा एक उत्पादन धोरणानुसार जिल्ह्यासाठी आंबा या पिकाशी संबंधित असावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तीक लाभार्थ्यांनी https://mofpi.nic.in/pmfme/  व http://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. तसेच शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वंयसहायता गट, सहकारी संस्था यांनी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत असे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व आत्मा कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा