पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘हर्बल एक्स्ट्रॅक्शन’ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
कुडाळ
येथील पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ व एपीटीआय-एमएस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर्बल एक्स्ट्रॅक्शन’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी मुंबई येथील नामांकित आयसीटी संस्थेचे संशोधक व तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. कीर्ती लड्ढा यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान डॉ. लड्ढा यांनी निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध कच्च्या वनौषधी पदार्थांमधून औषधी घटक वेगळे करण्याच्या प्रचलित व आधुनिक पद्धती सुलभ भाषेत समजावून सांगितल्या. तसेच औषधी घटकांचे रासायनिक पृथक्करण, प्रयोगांसाठी लागणारी रसायने, उपकरणे व मशिनरी यांचा वापर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे करून दाखवण्यात आला. प्रशिक्षणार्थींना सहज समजेल अशा प्रयोगात्मक पद्धतींवर भर देण्यात आल्याचे डॉ. लड्ढा यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष भूपतसेन सावंत व परिसर संचालिका सौ. नूतन परब यांच्या पुढाकारातून या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सांगता समारंभात डॉ. कीर्ती लड्ढा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांच्या हस्ते २२ प्रशिक्षणार्थींना सहभागाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक महादेव परब यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक म्हणून सहाय्यक प्राध्यापक महादेव परब व प्रतीक तेर्से यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
