*ज्ञानोत्सवात चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने*
पिंपरी
लर्निव्हर्स स्कूल आणि भाषा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानोत्सव’ या विज्ञान – आरोग्य – संगीत – नृत्य आणि मनोरंजनात्मक आनंद सोहळ्यात पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे बहारदार सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली. व्ही डी आर मैदान, साईनगर, गहुंजे येथे शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी संपन्न झालेल्या या आनंद सोहळ्यात भाषा अकॅडमीचे संस्थापक – अध्यक्ष दीपक पागे, सहसंचालिका प्रीती गायतोंडे, समुपदेशिका ज्योती जंगम, जर्मन भाषातज्ज्ञ गंधाली बारसोडे, डाॅ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाचे डाॅ. आशिष चिंबळकर, डाॅ. अनिकेत गरुड आणि लर्निव्हर्स स्कूलच्या संस्थापक – संचालिका प्रियंका नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि चिमुकल्यांनी एका सुरात म्हटलेल्या रामरक्षेने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक हाॅस्पिटलच्या वतीने ध्यानधारणा प्रक्रियेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आलीत. पारंपरिक वेषभूषेतील बालकांनी विविध नृत्यगीतांचे बहारदार सादरीकरण करीत मंत्रमुग्ध केले. मोकळ्या मैदानात सुमारे पंचेचाळीस
चिमुकल्या वैज्ञानिकांनी उभारलेल्या विज्ञान प्रदर्शनातील वैविध्यपूर्ण प्रयोग हा या परिसरातील एकमेव उपक्रम सर्वांना आकर्षित करणारा ठरला. साहजिकच त्याला भरघोस प्रतिसाद लाभला. विनामूल्य आरोग्य शिबिराचा पालकांनी लाभ घेतला; तर खाद्यपदार्थांच्या स्टॅालवर सर्व वयोगटातील व्यक्तींनी ताव मारला. लर्निव्हर्स स्कूल रावेत शाखा संचालिका रोहिणी पडळ, गहुंजे शाखा संचालिका मोनिका देशपांडे, समन्वयक मेघा मिसाळ, खजिनदार मीनाक्षी पवार, भूषण कुदळे आणि सहकारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. समीक्षा मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

