*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*परतून*
मिट्ट काळोख सरतो
पहाट येते परतून
दशदिशा उजळतात
चैतन्याने व्यापून…..!!
फेसाळत सागरलाटा
किनारी येतात धावून
काठावरती भेट अनावर
पुन्हा जातात परतून….!!
तुझ्याकडे आयुष्या
जेव्हा बघते परतून
वादळ वारे थोपवते
मनात आलेले दाटून….!!
संध्याकाळी उडे गोधुली
गायी येती धावत परतून
वासरांना ओढ भेटीची
सांगतात सारे हंबरून…!!
सैनिका…सीमारक्षणास
जातोस तत्काळ निघून
घर वाट पहाते तुझी रे
ये सुखरूप परतून…!!
आकांक्षा तुज ठेंगण्या
दूरदेशीचे स्वप्न सजवून
थकलेले डोळे बघती
कधी रे बघशील परतून…!!
त्या वळणावरही नाही
तू पाहिलेस परतून
काळीज फाटले माझे
नाते गेले संपून….!!
तो भातकुलीचा खेळ
बाहुली छान सजवून
येईल का कधी गोड
बालपण हसरे परतून…!!
काळ ना कधीही
येतो पुन्हा परतून
येतात त्या आठवणी
काळीज कप्प्यातून….!!
आले भरून डोळे
बघतांना परतून
हा जन्म मानवाचा
देवा दिलास उजळून…!!
〰️〰️〰️〰️〰️〰️
अरुणा दुद्दलवार✍️🌹🖊️
